पनवेल : मागील दोन वर्षांपासून तळोजा कारागृहात कर्नाळा बॅंक गैर व्यवहारात अटकेत असलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांनी कारागृहातून पत्र जाहीर केले असून त्यामध्ये आजारपणाला कंटाळून शेकापच्या सक्रिय राजकारणातून राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.
पाटील यांचे राजीनामा पत्र गुरुवार सकाळपासून समाजमाध्यमांवर पसरल्याने पनवेलमध्ये राजकीय चर्चेला सुरुवात झाली. शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांनी हे राजीनामा पत्र खरं असल्याचे सांगत ही शेकाप कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी दुदैवी बाब असल्याचे यावेळी स्पष्ट केले. परंतु लवकरच विवेक पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा राजकारणात सक्रिय होण्यासाठी विनंती करणार असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा – पनवेल पालिकेमध्ये ३७७ पदांसाठी जम्बो नोकर भरती
विवेक पाटील हे शेकापमध्ये १९७९ पासून सक्रिय होते. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती तसेच चार वेळा विधानसभा सदस्य म्हणून ते निवडून आले होते. २० वर्षांच्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी पनवेलमधील लेडीज सर्व्हिसबारमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा मुद्दा विधिमंडळात मांडल्यानंतर राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी राज्यात लागू केली होती. चार वर्षांपूर्वी विवेक पाटील यांच्यावर ते अध्यक्ष असलेल्या कर्नाळा बॅंकेत त्यांनी ५४८ कोटी रुपयांचा गैर व्यवहार केल्याचा आरोप भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला.
हेही वाचा – भंडारा : डबे सोडून रेल्वे इंजिन निघाले सुसाट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
विवेक पाटील यांच्यासह त्यांचे पुत्र आणि बॅंकेच्या इतर संचालकांवर कारवाई सुरू असताना विवेक पाटील यांनी शेकापमधून राजीनामा दिल्याची घोषणा केल्याने पनवेल व उरण परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे पूत्र भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कर्नाळा बँकेचे प्रकरण उजेडात आणून विवेक पाटील यांच्यावर कारवाई करण्यास सीआयडी आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) विभागांना भाग पाडले होते. यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी ईडी कार्यालयात पाठपुरावा केला होता.