पनवेल : पनवेल पालिकेच्या पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर या चारही प्रभाग कार्यालयांमध्ये नगरविकास विभागाकडून चार सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालिका आयुक्तांनी पुढचे पाऊल उचलत नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी गुरुवारी प्रभाग अधिकारी आणि प्रभाग अधीक्षकांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्धीपत्रकामार्फत प्रसारमाध्यमांना देऊन पालिकेचा कारभार अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा…घरबसल्या पैसे कमावण्याच्या आमिषाने ८ लाखांची फसवणूक

आकृतीबंधामध्ये प्रभाग अधिकारीपदी सहाय्यक आयुक्ताची नेमणूक करण्याची तरतूद असून यानुसार पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पनवेल प्रभाग ‘ड’ कार्यालयामध्ये डॉ. रूपाली माने यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तसेच कामोठे प्रभाग ‘क’कार्यालयामध्ये सुबोध ठाणेकर यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर कळंबोली प्रभाग ‘ब’ कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्याकडे प्रभाग अधिकारीपदाची सूत्रे सोपविली आहेत.

उच्चशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या खारघर प्रभाग ‘अ’च्या प्रभाग अधिकारी पदावर सहाय्यक आयुक्तपदी स्मिता काळे यांची नियुक्ती केली आहे. दोन महिला सहाय्यक आयुक्त अधिकाऱ्यांच्या हाती प्रभाग अधिकारीपद सोपवून आयुक्तांनी कामकाजाचे समान वाटप केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.

हे ही वाचा…नौदलाच्या सुरक्षा पट्ट्यामुळे पुनर्विकासाची ‘रखडपट्टी’संरक्षणमंत्र्यांना साकडे घालूनही ३२ वर्षांपासून प्रतीक्षाच

पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या समस्येसाठी प्रभाग कार्यालयाशी प्रथम संपर्क साधावा, त्यानंतर प्रभाग कार्यालयातून प्रतिसाद न मिळाल्यास प्रभाग अधीक्षकांशी संपर्क साधावा आणि प्रभाग अधीक्षकांकडूनही प्रतिसाद न मिळाल्यास संबंधित समस्येसाठी थेट सहाय्यक आयुक्तांशी नागरिक संपर्क साधू शकतील यासाठी पालिकेने गुरुवारी सर्व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक जाहीर केले आहेत.

सहाय्यक आयुक्त पदावरील अनेक चेहरे पनवेलमध्ये नवीन असल्याने त्यांना परिसराच्या माहितीसाठी तत्कालिन प्रभाग अधिकाऱ्यांना त्याच प्रभागात प्रभाग अधीक्षक या पदावर नेमले आहे. यामध्ये प्रभाग ‘ड’मध्ये रोशन माळी (८१०८८९३५८५), तर प्रभाग ‘क’ सदाशिव कवठे (९८१९६३३१७४), अरविंद पाटील (९३२२३५१८९७) प्रभाग ‘ब’ आणि प्रभाग ‘अ’ येथील जितेंद्र मढवी (९८१९९९८७८८) यांची नेमणूक केली आहे.

हे ही वाचा…नवी मुंबई : सिडकोत जनता दरबार लवकरच

सहाय्यक आयुक्तांचे मोबाइल क्रमांक

● प्रभाग ड – डॉ. रूपाली माने – ८१०८२३८३०३

● प्रभाग क -सुबोध ठाणेकर – ८४५०९९२१२९

● प्रभाग ब – श्रीराम पवार – ७८२०८८५९७१

● प्रभाग अ – स्मिता काळे – ९६६५२८३५९९