पनवेल महापालिकेतील ‘अमृत २’ या अभियानंतर्गत राबवण्यात येत असलेल्या चार महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी ४२४ कोटी १७ लाख रूपये केंद्र सरकारने मंजूर केले आहेत. २० सप्टेंबरपर्यंत शासकीय निर्णय झाल्यानंतर पालिकेकडे निधी उपलब्ध होईल असे भाजपचे पनवेलमधील नेते परेश ठाकूर यांनी सूतोवाच केले आहे. ठाकूर यांनी पाच वर्षे पालिकेचे सभागृह नेते पदाचे काम पाहीले आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या प्रयत्नांमुळे अमृत २ ही योजना यशस्वी रित्या मंजूर होत असल्याची माहिती पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली. या योजनांमुळे पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागालाही विकासाची नवी दिशा मिळणार आहे.
हेही वाचा >>> उरण नगरपरिषदेच्या जलवाहिनीला गळती,मोरा परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम ; गळतीमुळे उरण मोरा मार्गावर खड्डा
पनवेल महानगरपालिकेच्या ‘अमृत २’ या अभियानांतर्गत चार वेगवेगळे प्रकल्प राबविले जात आहेत. यातील पहिल्या प्रकल्पात पालिका क्षेत्रातील २९ गावांकरीता होणाऱ्या पणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रती माणशी १३५ लिटर पाणी प्रतिदिन उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी १५४ कोटी ४९ लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. दुसऱ्या प्रकल्पात पालिका क्षेत्रातील २९ गावांकरीता मलनि:स्सारण योजनेतील मलनि:स्सारण वाहिन्या टाकणे आणि मलनि:स्सारण प्रक्रिया केंद्र बांधणे. यासाठी २०६ कोटी ७५ लाख रूपये मंजू करण्यात आले आहेत. तिसऱ्या प्रकल्पात पनवेल शहरासाठी (१५.५० दश लक्ष लीटरचा) अतिरिक्त एस.टी.पी. प्लांट बांधण्यासाठी ५२ कोटी २० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. चौथ्या प्रकल्पानुसार पालिका क्षेत्रातील पिसार्वे गावातील तलावाचे सुशोभीकरण करणे, गाळ काढणे आणि पाण्याचा दर्जा उंचावण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी १३ कोटी ७३ लाख रूपये केंद्राकडून मंजूर करून घेण्यात आल्याची माहिती माजी सभागृह नेते परेश यांनी दिली. पनवेलच्या विकासकामांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून गेले तीन वर्षे रखडलेला अमृत प्रकल्प पुन्हा मंजूर करून घेतल्याबद्दल परेश ठाकूर यांनी फडणवीस यांचे आभार मानले आहेत.