प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही चोरीस; प्रवाशांची अडचण
संतोष जाधव, नवी मुंबई</strong>
शीव-पनवेल महामार्गावरील नेरुळ येथील चारही अर्धवट भुयारी मार्ग वापरात यावेत म्हणून पालिकेने ४३ लाखांचा खर्च केला. मात्र हे भुयारी मार्ग अंधारातच आहेत. ते तळीरामांचा अड्डा बनली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे प्रकाशव्यवस्था व सीसीटीव्ही यंत्रणाच चोरीसगेली आहे. त्यामुळे प्रवाशी वापर करीत नसून दुर्लक्षामुळे लाखोंचा खर्च वाया गेला आहे.
हा महामार्ग मुंबई व नवी मुंबई शहराला जोडणारा महत्त्वाचा आहे. याचे मे.टोलवेज प्रा. लि.कंपनीतर्फे विस्तारीकरण करण्यात आले होते. परंतु ठेकेदाराने नेरुळ, एलपी येथील दोन, टाटा प्रेस येथील एक व उरण फाटय़ाजवळ एक या चारही भुयारी काम अपूर्ण ठेवले होते. हा वाद न्यायालयात गेल्याने काम तसेच पडून होते.
नेरुळ येथील डी.वाय. पाटील स्टेडियमवर फुटबॉल विश्वचषक आयोजित केल्यानंतर महापालिकेने अर्धवट अवस्थेत असलेल्या या चार भुयारी मार्गासाठी ४३ लाखांची निविदा काढून काम पूर्ण केले. वीजव्यवस्था व सीसीटीव्ही यांच्यासाठी जवळजवळ ७ लाखाचा खर्च केला.
परंतु आज हे चारही भुयारी मार्ग अंधारात आहेत. एलपी जवळील भुयारी मार्गात पाणी साचले आहे. तर उरणफाटाजवळील भुयारी मार्ग तळीरामांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे प्रवासी यातून प्रवास करण्यास धजावत नाहीत. प्रकाशव्यवस्थेचे सर्व साहित्य चोरीला गेले आहे. तर सीसीटीव्हीसुद्धा चोरीस गेले आहेत. पाणी साचल्याने अंधारात नागरिकांनी जायचे कसे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. त्यामुळे पालिकेने चारही भुयारी मार्गासाठी केलेला सुमारे ५० लाखाचा खर्च पाण्यात गेला आहे.
नेरुळ येथे महामार्ग ओलांडणे धोक्याचे
नेरुळ एलपी थांब्याजवळ महामार्ग ओलांडणे सततच्या वर्दळीमुळे धोक्याचे झाले आहे. त्यात भुयारी मार्गातून प्रवास करणे अशक्य असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील एलपी नाक्यावर प्रवाशांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. नेरुळ एलपी बसथांब्यावरून नेरुळहून मुंबई, ठाणेसह विविध उपनगरात दररोज हजारो प्रवाशी प्रवास करतात. तसेच मुंबईबाहेरूनही हजारो एसटीबस यथे थांबतात. एनएमएमटीच्या प्रवाशांची संख््याही मोठी आहे. त्यामुळे हा येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. महामार्ग ओलांडणे त्यामुळे जिकिरीचे होत आहे.
नेरुळ येथील पादचारी भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले आहे. संपूर्ण मार्ग अंधारात असतो. एलपी बसथांब्यावर महामार्ग ओलांडून जायचे म्हणजे जीव मुठीत घालून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे ये जा कशी करावी ही समस्या आहे. पालिकेने या भुयारी मार्गाची दुरस्ती करावी.
-महेश काळे, प्रवासी नेरुळ
प्रकाशव्यवस्था तसेच सातत्याने रहदारीच्या असलेल्या एका भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु येथील सर्व साहित्य चोरीस गेले आहे. याबाबत नेरुळ पोलिसांमध्ये पालिकेने तक्रारही दिली आहे. सातत्याने सर्व साहित्य चोरीस जात आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
-सुनील लाड, कार्यकारी अभियंता