पनवेल: रेलिगेयर आरोग्य विमा पुरविणा-या कंपनीविरोधात नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. बेलापूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानंतर फौजदारी कारवाई पोलिसांनी केली आहे. या प्रकरणात कंपनीचे संचालक आणि व्यवस्थापक अनुज गुलाटी यांच्यासह नऊ जणांविरोधात ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने ६४ हजार रुपयांची विम्यातील फसवणुकी बद्दल न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
८० वर्षीय इंद्र बहादूर मानिका सिंग हे सेवानिवृत्त असून ते बेलापूर येथील सेक्टर ८ मधील ईशान इमारतीमध्ये राहतात. इंद्र बहादूर सिंग व त्यांची पत्नी विमला देवी यांनी दिलेल्या पोलीसात केलेल्या तक्रारीनूसार रेलीगेयर कंपनीची विमा पॉलीसी ६४,२५८ रुपयांची घेतली होती. परंतू सिंग यांना कंपनीने कोणतीही सूचना न देता थेट पॉलिसीमधून वगळले. यासाठी कंपनीने त्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्याचे पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा: सागरी सुरक्षा कवच अंतर्गत उरणच्या किनाऱ्यावर सतर्कता; पुढील ३६ तास चालणार शोध मोहीम
सिंग यांनी याबाबत पहिल्यांदी बेलापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी क स्तर यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने याबाबत रितसर सीआरपीसी कलम 156(3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यावर रेलिगेयर हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे संचालक गुलाटी, शामलाल मोहन, समशेर सिंग मेहता, श्रीमती आशा नायर, मलयकुमार सिन्हा, सिद्धार्थ दिनेश मेहता, श्रीमती रश्मी, सुशीलचंद्र त्रिपाठी, कार्तिकेय ध्रव काझी, राकेश खन्ना यांच्याविरोधात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.