लोकसत्ता प्रतिनिधी
पनवेल: महावितरण कंपनीकडून बोलतोय, तूमचे वीजदेयक थकले असून महावितरण अॅपवरुन देयक न भरल्यास वीज खंडीत होईल असा बहाणा करुन कळंबोलीतील एका वीजग्राहकाची तब्बल पाऊणेसात लाखांची ऑनलाईन फसवणूक केली आहे.
कळंबोली पोलीस ठाण्यात याबाबत रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ४७ वर्षीय भिमराव बेंबले यांची या घटनेत फसवणूक झाली आहे. बेंबले हे कळंबोली वसाहतीमधील सेक्टर ११ येथील गुरुकुटीर सोसायटीत राहतात. २१ मे ला सायंकाळी सव्वा सहा वाजता बेंबले यांना ९०३८३६४३१३ या मोबाईल क्रमांकावरुन फोन आला.
हेही वाचा… वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
फोन करणा-या व्यक्तीने वीज देयक न भरल्याने वीज प्रवाह खंडीत होणार असल्याचे सांगीतल्यानंतर बेंबले यांनी वीजदेयक भरण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे मोबाईल फोनवरुन संपर्क करणा-या व्यक्तीने महावितरण नावाचे अॅप बेंबले यांच्या मोबाईलवर पाठविले. अॅपमध्ये देयक जमा करण्याची प्रक्रीया सूरु असताना ओटीपी मोबाईलवरुन बोलणा-या व्यक्तीला दिल्याने बेंबले यांच्या बॅंकखात्यामधील सहा लाख ८७ हजार ९१७ रुपये वळते झाले. बेंबले यांची सोमवारी याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.