लोकसत्ता टीम
पनवेल- नवी मुंबईत भाड्याने कार्यालये थाटून परदेशात जास्त पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना कोट्यावधी रुपयांना लुटणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात कळंबोलीत शेकडो जणांची फसवणूकीचे प्रकरण ताजे असताना मंगळवारी खारघर पोलीस ठाण्यात ११२ जणांची ८१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करुन भामटे पसार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि शेकडो तरुणांची फसवणूकीच्या या प्रकरणाचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे प्रतिबंध शाखेने केल्यास फरार झालेले भामटे लवकर पोलीसांच्या हाती लागतील अशी अपेक्षा तरुणांकडून होत आहे.
पश्चिम बंगाल येथील बद्रम्हान राज्यातील कालना जिल्ह्यात राहणारे ४० वर्षीय अविजीत हलदार यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीमध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात खारघर येथील सेक्टर १२ मधील गुडविल इन्फीनीटी या इमारतीमध्ये ग्लोबल जेटलाईन अण्ड हॉलीडेज या कार्यालयामधून बनावट विमान तिकीट आणि व्हीसा काढल्याचे भासवून परदेशात जास्तीच्या पगाराच्या नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे जमवून भामटे पसार झाले.
आणखी वाचा-मुंबईचा वैद्यकिय कचरा आता रायगडात, देवनारची दुर्गंधी कमी होणार ?
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात कळंबोली येथे अशाच प्रकारे ग्लोबल इंटरनॅशनल एज्युकेशन सेंटर एण्ड ज्युनिअर एज्युकेशन सर्व्हीसेस या कंपनीने शेकडो तरुणांना परदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली आहे. या कार्यालयामध्ये देशभरातील शेकडो तरुणांनी पैसे जमा केले होते. या दोन्ही प्रकरणातील फसवणूक कोट्यावधी रुपयांची असल्याने या प्रकरणाचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाकडे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी द्यावा अशी मागणी होत आहे.