नवी मुंबई : समाजमाध्यमाद्वारे पैसे कमवण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ऑनलाइन टास्क पूर्ण करा, भरपूर पैसे कमवा असे आमिष दाखवून एका महिलेची ४१ लाख ९२ हजार ५८२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला वाशीत राहत असून रोखपाल म्हणून काम करतात. २ जूनला त्यांना रँक माय अॅप कंपनीकडून प्रतीक्षा नावाच्या महिलेचा फोन आला. त्यांनी टेलिग्राम या समाज माध्यमातील टास्क पूर्ण केल्यास एका फेरीसाठी ८०० ते १००० रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

हेही वाचा >>>फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

सहज बसल्या बसल्या हे काम होते. म्हणून फिर्यादी महिलेने काम करण्याची तयारी दाखवली. मात्र आगाऊ रक्कम, देयक देण्यापूर्वी विविध कर, हे काम करण्यासाठी नोंदणी शुल्क आदी कारणे पुढे करीत फिर्यादी यांच्याकडून २ जून ते ३ नोव्हेंबरदरम्यान ४२ लाख ८१ हजार ३४६ रुपये विविध खात्यांत मागवून घेतले.

अनेकदा मागणी केल्यावर त्यापैकी ८८ हजार ७६४ रुपये परत करण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत राहिले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी महिलेने या व्यवहारात त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या चार जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत वाशी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of rs 42 lakhs through social media navi mumbai crime news amy