शेखर हंप्रस, लोकसत्ता
नवी मुंबई : इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल्स टाकण्याच्या कामात कंत्राटदार पालिकेच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धूळफेक करीत आहेत. ही खोदकामे ब्लीड मशीनने करणे असे वर्क ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद असताना जेसीबी हॅमरने खोदकाम केले जात आहे. याकडे मनपासंबंधित विभागाचे होणारे दुर्लक्ष अर्थपूर्ण दुर्लक्ष म्हणून शंका उपस्थित केली जात आहे. मात्र खोदकाम करताना ब्लेडऐवजी जेसीबी हॅमर वापरला जात असल्याचे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर नेरुळ आणि कोपरखैरणे येथील काम बंद करण्यात आले होते.
नवी मुंबईत सध्या अनेक ठिकाणी आंतरजालच्या वाहिन्यांसाठी (इंटरनेट केबल्स) रस्त्याच्या कडेला खोदकाम सुरू आहेत. या कामात मनपाची फसवणूक केला जात असल्याचा आरोप होत आहे. मायक्रो ट्रेंच पद्धतीने रस्ते खोदण्यासाठी परवानगी दिली गेली असताना जेसीबी मशीन वापरून ही खोदकामे केली जात आहेत. वास्तविक रस्त्याच्या कडेने केवळ फायबर ऑप्टिक केबलपुरते खोदकाम करण्यासाठी मायक्रो ट्रेंच पद्धतीने खोदकाम केल्याने रस्त्याला तडे जात नाहीत.
आणखी वाचा-खोपटे ते आवरे परिसरातील खाडी किनाऱ्यावरील शेती वाचविण्यासाठी हवेत ३ कोटी ४१ लाखांचा निधी
ब्लेडने किंवा करवतीने ज्या प्रकारे एखाद्या वस्तूने कागद कापला जातो त्याप्रमाणे रस्ता कापला जाऊन फायबर ऑप्टिकपुरते सरळ रेषेत खोदकाम केले जाते. त्यामुळे रस्त्याचे नुकसान फारसे होत नाही. याच कारणाने त्याच दराप्रति मीटर पाचशे रुपयांच्या घरात मनपा आकारते. मात्र हे काम काहीसे धिम्या गतीने होते. त्यामुळे लवकरात लवकर काम संपवण्यासही जेसीबी हॅमर मशीनचा वापर अनेक ठिकाणी केला जात आहे. जेसीबी पद्धतीने जर खोदकाम करावयाचे असेल तर त्याचा दर प्रतिमीटर दहा हजारांच्या घरात आहे. मात्र याने काम वेगात होते. त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याकडे कंत्राटदाराचा कल आहे. मात्र जेसीबी हॅमर पद्धतीने काम केल्यावर धूळ आणि जोरदार घणाघात बसल्याने रस्ते उखडण्याचे प्रकार होत आहेत.
अशाच प्रकारे कोपरखैरणे सेक्टर ५ येथील बालाजी चित्रपटगृहासमोर आणि नेरुळ येथे एक ठिकाणी काम सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास काही जागरूक नागरिकांनी आणल्याने तेथील काम बंद करण्यात आले. मात्र पुढे दंड लावल्याचे ऐकिवात नाही, अशी माहिती मनपाला माहिती देणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीने दिली.
नेरुळ स्टेशनसमोर असा प्रकार सुरू असल्याचे कळताच आम्ही सदर ठिकाणी पाहणी केली. जेसीबी वापरात असल्याचे निदर्शनास आल्याने काम बंद करण्यात आले. जमिनीखाली खडक लागल्याने जेसीबी वापरला, असे सांगण्यात आले होते. याबाबत लवकरच योग्य ती पावले उचलली जातील, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त सोमनाथ पोटरे यांनी दिली.
आणखी वाचा-उरण : द्रोणागिरी पोखरणीला चाप बसणार, महसूल कर्मचाऱ्यांचा २४ तास जागता पहारा
कोपरखैरणे स्टेशनजवळ काही ठिकाणी जेसीबीचा वापर सुरू असल्याची माहिती मिळताच शुक्रवारी पाहणी केली. ज्या ठिकाणी असा प्रकार आढळून आला तेथील काम बंद केले आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार आहे. -श्रीराम पवार (परिमंडळ दोन उपायुक्त)
पालिकेची फसवणूक करणाऱ्यांना दंड आकारणे गरजेचे
वास्तविक मायक्रो ट्रेंचऐवजी जेसीबी बहुतांश ठिकाणी वापरला जात आहे. त्यामुळे कदाचित येत्या काळात वा एखादया हलक्या पावसातही रस्ते उखडून जातील. अशा पद्धतीने मनपाची फसवणूक करणाऱ्यांना दंड आकारणे गरजेचे असून केलेल्या कामाचे देयके जेसीबी वापरण्यासाठी असलेली देयके वसूल करावीत अशी मागणी केली जाणार आहे, अशी माहिती हा प्रकार उजेडात आणणाऱ्या व्यक्तीने दिली, मात्र त्याने माहिती देताना नाव छापू नये, अशी विनंती केली आहे.