पनवेल : शिवसेना बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली वसाहतीमधील सुधागड एज्युकेशनच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात रविवारी महाआरोग्य चिकित्सा शिबीराचे आयोजन केले आहे. ४० तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक या शिबिरात रुग्णांची तपासणी करणार आहेत.
सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या या शिबिरात सामान्य रोगांची चिकित्सेसह किडनी, हृदय, डोळ्यांची तपासणी केली जाणार आहे. शिबिरात संबंधित रुग्णाचे आजाराचे निदान झाल्यास मोफत औषधे दिली जाणार आहेत. तसेच शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान शिबिरात झाल्यास हजारो रुपये लागणारी शस्त्रक्रिया मोफत केली जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी दिली.
हेही वाचा – नवी मुंबई : जलवाहिनी फुटली, पाणी कमी दाबाने येणार
मोफत शस्त्रक्रियांमध्ये एन्जोग्राफी व एन्जोप्लास्टी, किडनीस्टोन, मोतिबिंदू या शस्त्रक्रिया होतील. तसेच मोफत चष्मावाटप केले जाणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.