नवी मुंबई: ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे शहर ही नवी मुंबईची ओळख असून आता नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा १३ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जाहीर करीत नवी मुंबईकर ज्येष्ठांना दिवाळी भेट देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नुकतेच तसे जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक दिलासा मिळालेला आहे.
नवी मुंबईकर प्रवाशांना समाधानकारक सेवा पुरविणारा उपक्रम म्हणून नवी मुंबईकरांची नेहमीच एनएमएमटी प्रवासाला पसंती लाभली असून नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील २०५ डिझेलवर चालणाऱ्या, ८५ सी.एन.जी. वर चालणा-या तसेच ५६ वातानुकूलीत व्होल्वो आणि १९५ वातानुकूलीत इलेक्ट्रीक अशा एकूण ५४१ बसेस आहेत. नमुंमपा परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत व हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात ४३ सर्वसाधारण व ३२ वातानुकुलीत अशा एकूण ७५ बस मार्गांवर प्रवाशी सेवा देण्यात येत आहे.
आणखी वाचा-नियमांचे पालन करा, नवी मुंबईतील बिल्डरांना महापालिकेचे निर्देश
सद्यस्थितीत परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा आदर करीत त्यांना बस प्रवास शुल्कात ५० टक्के सवलत दिली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत (एसटी) भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना १७ मार्च २०२३ पासून बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुध्दा मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी अशी मागणी नमुंमपा क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व लोकप्रतिनिधी यांचेकडून सातत्याने केली जात होती.
याबाबत सकारात्मक विचार करून नमुंमपा आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दि. १३ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असणाऱ्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमएमटी बसचा प्रवास मोफत असेल असे जाहीर केले आहे.
आणखी वाचा-मुंबईच्या प्रवेशद्वारावरील खारघर टोलनाक्यावर वाहनांवर पाण्याचा मारा सुरू
हा प्रवास करण्यासाठी ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी नमुंमपा परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेणे गरजेचे राहील. ओळखपत्राकरिता वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून जन्म तारखेचा दाखला अथवा पूर्ण जन्मतारीख नमूद असलेले आधार कार्ड सादर करणे आवश्यक असेल. तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवास पुरावा म्हणून मालमत्ताकर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वत:च्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. भाडेपट्टीवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी घराचा करारनामा (Agreement Copy) किंवा नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये किमान ०५ वर्षे रहिवाशी असल्याचा तहसिलदाराचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. अशा सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना परिवहन उपक्रमाचे ओळखपत्र प्राप्त करून घेता येईल. त्याकरिता कागदपत्राच्या मूळ व दोन छायांकीत प्रती तसेच पासपोर्ट आकारचे तीन फोटो सादर करणे आवश्यक राहील.
ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आपुलकीची आणि आदराची भावना अभिव्यक्त करीत ऐन दिवाळीमध्ये ६५ वर्षावरील नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना मोफत एनएमएमटी प्रवासाची दिवाळी भेट देण्याचा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय महापालिकेची लोककल्याणकारी प्रतिमा उजळविणारी असून या निर्णयाबद्दल आयुक्त श्री. राजेश नार्वेकर आणि नमुंमपा परिवहन उपक्रमाचे ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.