उरण : मोरा ते मुंबई दरम्यानच्या जलमार्गातील तिकीट दरात शुक्रवारपासून (१ सप्टेंबर) २५ रुपयांची कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील हजारो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. मात्र उरणच्या करंजा ते अलिबागमधील रेवस दरम्यानच्या जलप्रवासाचे दर वाढविण्याची मागणी वाहतूकदारांनी केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास महागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१ जून ते ३१ ऑगस्ट या पावसाळी हंगामासाठी मोरा ते मुंबई जलप्रवासाचे दर २५ रुपयांनी वाढविण्यात आले होते. त्यामुळे एका फेरीचे ८० रुपये दर १०५ रुपयांवर गेले होते. याचा उरण ते मुंबई बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसत होता. त्याचप्रमाणे तीन महिन्यांपासून पावसाळी हंगामात बंद करण्यात आलेली रेवस – भाऊचा धक्का हा सागरी जलमार्गही १ सप्टेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ऐन गणपती सण जवळ असताना सुरू होणाऱ्या प्रवासी वाहतूकमुळे अलिबाग-कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय दूर होणार आहे. तसेच मोरा सागरी प्रवासही स्वस्त होणार असल्याने प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा – तुम्हाला कर्ज मिळाले आहे… असा फोन आला तर सतर्क व्हा, अन्यथा फसवणूक 

हेही वाचा – शीव-पनवेल महामार्गावरील रोडपाली येथील धोकादायक पूल वाहतुकीस बंद

वादळ व मुसळधार पाऊस, बदलणारे हवामान समुद्रात उठणाऱ्या उंचच उंच लाटा यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळी हंगामासाठी दरवर्षी रेवस – भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते. या सागरी मार्गावरील तिकीट दर १०० रुपये आहे, तर
गेटवे-मांडवा मार्गावरील स्पीडबोट आणि रो-रो बोटसेवा यांच्या तिकीट दरांपेक्षा सर्वसामान्यांना रेवस – भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील प्रवास परवडतो. त्यामुळे हजारो सर्वसामान्य प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. तीन महिन्यांसाठी या सागरी मार्गावर बंद ठेवण्यात आलेली प्रवासी बोट सेवा १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची, तसेच मोरा मुंबई मार्गावरील दरही २५ रुपयांनी कमी होणार असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सेक्रेटरी शराफत मुकादम यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: From friday the ticket price on the mora mumbai waterway will be reduced by rs 25 ssb