नवी मुंबई : राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाने दिलेल्या सुचनेनुसार महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ विभागाच्या बारवी धरणातील पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक २६ मे रोजी दुपारी १२ ते शनिवार २७ मे दुपारी १२ वाजेपर्यंत असे २४ तास बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत नवीन जलवाहिन्यांवरील गुरुत्व जल कार्यान्वित करण्याचे काम करण्यात येणार असल्याने एमआयडीसीच्या जलवाहिनीवर अवलंबवून असणाऱ्या भागात पाणी पुरवठा होणार नाही.
एमआयडीसीच्या बारवी धरणातून पाणीपुरवठा विभागामार्फत ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा भांयदर तसेच अंबरनाथ, बदलापूर आदी भागांत पाणी पुरवठा केला जातो. आता वाढते तापमान पाहता राज्यातील धरणांमधील पाण्याचा साठा कमी होत असल्याने आगामी दिवसांत पाण्याची निकड पाहता सर्व धरणांतील पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशा सूचना पाटबंधारे खात्यामार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शुक्रवार दिनांक २६ मे दुपारी १२ ते २७ मे २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत असे २४ तास एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा – नवी मुंबई शहरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही उशीरानेच
याच दरम्यान एमआयडीसीने बारवी जल योजनेअंतर्गत टाकलेल्या नवीन जलवाहिन्यांच्या गुरुत्व टाकण्याचे तातडीचे काम करण्यात येणार आहे. त्यानुसार शुक्रवार दिनांक २६ मे दुपारी १२ ते २७ मे २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत असे २४ तास एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबईतील औद्योगिक क्षेत्रात शुक्रवार ते शनिवार असे २४ तास पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. याची संबंधित व्यावसायिकांनी, कंपनी मालकांनी तसेच या भागात राहणाऱ्या रहिवासी नागरिकांनी नोंद घेऊन काळजी घ्यावी व पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापे एमआयडीसीने केले आहे.