पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील रहिवाशांना जून महिन्यापर्यंत ‘न्हावाशेवा टप्पा तीन’ या योजनेतून जादा ५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) अधिकाऱ्यांनी नियोजन केले आहे. पनवेल पालिकेत नुकत्याच झालेल्या बैठकीत एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.

एप्रिल महिन्यात न्हावाशेवा टप्पा तीन योजनेतील पाताळगंगा नदीवरील पाणी उपसा करणाऱ्या पंपहाऊसच्या उभारणीचे काम पूर्ण केले जाईल अशी माहिती एमजेपीचे उपअभियंता रमेश वायदंडे यांनी दिली. या योजनेतील निम्मे तरी पाणी तरी पनवेल पालिकेला जून महिन्यापर्यंत जादा देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे एमजेपीने स्पष्ट केले.

सध्या पनवेल महापालिका आणि सिडको वसाहतींना एमजेपीकडून १२० दश लक्ष लीटर (एमएलडी) पाण्याचा पुरवठा केला जातो. न्हावाशेवा टप्पा तीन ही योजना एकूण २२८ एमएलडी पाणी पुरवठ्यासाठी बनविण्यात आली होती. यासाठी ३५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर पनवेल महापालिकेला १०० एमएलडी, जेएनपीएला ४० एमएलडी, सिडको मंडळाला ६९ एमएलडी आणि एमएमआरडीएला १९ एमएलडी असा पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेच्या कामाचे कार्यादेश संबंधित कंपनीला २०२२ ला देण्यात आले. हे काम ३० महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत सरकारने दिली होती. मात्र एकाच कंत्राटदार कंपनीवर संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी दिल्यामुळे वाढलेल्या साहित्याच्या दरामुळे काम अनेक महिने ठप्प होते. त्यामुळे कामाची मुदत पुन्हा १५ महिन्यांनी वाढविण्यात आली. मात्र वाढवलेल्या मुदतीनंतरही काम पूर्ण न करु शकल्याने अजून काही महिन्यांची मुदत वाढीचा प्रस्ताव एमजेपीच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती एमजेपीचे उपअभियंता वायदंडे यांनी दिली.

या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या दरम्यान जून महिन्यापर्यंत या योजनेतून ५० एमएलडी पाणी पनवेल पालिकेला जादा मिळू शकेल यासाठी एमजेपीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधित योजनेचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध सरकारी विभागांचे अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

एप्रिल महिन्यात पाताळगंगा नदीवरील वायाळ स्टेशन येथील पंपहाऊसचे काम पूर्ण होण्याचे आमचे नियोजन आहे. तसेच न्हावाशेवा टप्पा तीन या योजनेच्या कामात आढावा बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध टप्पे आम्हाला आखून दिले आहेत. योजनेतील ५० एमएलडी पाणी जून महिन्यात पनवेल महापालिका क्षेत्राला मिळेल असे आमच्या विभागाचे नियोजन आहे. – रमेश वायदंडे, उपअभियंता, एमजेपी

Story img Loader