लोकसत्ता प्रतिनिधी
उरण : समुद्राच्या उधाणाने खोपटे ते आवरे परीसरातील जवळपास दहा किलोमीटर लांबीची खार बंदिस्ती नादुरुस्त होऊन हजारो एकर पिकत्या भात शेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान होत आहे. ही शेती वाचविण्यासाठी खारलँड विभागाने ३ कोटी ४१ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याला मंजुरी मिळावी अशी मागणी उरणच्या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र येणार आहेत.
खोपटे ते आवरे बांध परिसरात पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी,सांग पाले खार,काशी,पारंगी,रेवचा वळा खार येथील जमीनी आहे. या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहेत. दरवर्षी पावसाच्या पुराने तर आता समुद्राच्या कहराने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नापिकीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
आणखी वाचा-उरण : द्रोणागिरी पोखरणीला चाप बसणार, महसूल कर्मचाऱ्यांचा २४ तास जागता पहारा
उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडी किनाऱ्यावरील शेती करीत आहेत. मात्र या परिसरात होणाऱ्या औद्योगिकरणामुळे मिठाचा व्यवसाय संपुष्टात आला आहे. त्यात खारलँड विभागाने उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या मजबुती ची कामे न केल्याने,भात शेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहे. तरी शासनाने पुढाकार घेऊन भात शेती वाचविण्यासाठी बंदिस्तीचे मजबुतीकरण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून माहिती घेतली जाईल असे मत पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी व्यक्त केले आहे. उरणच्या खार बंदिस्त्यांची डागडुजी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उरण तालुका अध्यक्ष ॲड.सत्यवान भगत, पिरकोन ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य तथा उपतालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी केली आहे.