उरण : मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून उरणला जोडणाऱ्या मोरा- मुंबई, करंजा -रेवस,जेएनपीटी – भाऊचा धक्का आदी जलमार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. खराब हवामानामुळे विभागाने बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावला आहे.
परिणामी गेटवे -एलिफंटा , गेटवे -जेएनपीए ,मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस या मार्गावरील सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसाचा फटका येथील सागरी प्रवासी वाहतुकीलाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून गेटवे ऑफ इंडिया – एलिफंटा दरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे निरीक्षक नितीन कोळी यांनी दिली. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली आहे.
हेही वाचा…कोणीही या… फलक लावा…उलवे वसाहतीमधील रस्त्यांचे चौक फलकांमुळे विदृप
यामुळे विविध सागरी मार्गावरील पर्यटक, प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय होत आहे.