स्मार्टफोन आणि परदेशी प्राण्या-पक्ष्यांचा घरप्रवेश भारतात एकाच कालावधीत झालेला आहे. पाळीव प्राण्यांच्या उत्पादनांची बाजारपेठ आणि अॅण्ड्रॉइड फोन्सची वैविध्यपूर्ण बाजारपेठ अगदी अलीकडे रुळली. स्मार्टफोनमुळे संगणकावरचा गेम छोटुकल्या डबीमध्ये आणून ठेवला. मैदानी खेळांची हौस त्यामुळे मोबाइलवर फिटविणाऱ्यांची संख्या वाढली. गंमत म्हणजे माणसांना आभासी जगातील खेळांनी भुरळ घातली, तेव्हा आपल्या प्राण्यालाही अशा आभासी खेळाची किल्ली मिळावी, अशी गरज प्राणिपालकांकडून व्यक्त होऊ लागली. मग प्राण्यांचे लाड करण्यासाठी बाजारपेठेने प्राण्यांना आभासी खेळगडी उपलब्ध करून दिले. मोकळ्या परिसरात दोरीला बांधलेले रीळ, बॉल, लोकरीचा गुंडा पकडणे हे पूर्वी कुत्र्यांचे किंवा मांजरींचे आवडीचे खेळ होते. आता ते मोबाइल किंवा टॅबच्या स्क्रीनवर प्राण्यांसाठी उपलब्ध करून दिले जाते. त्यावर एखादा आभासी चेंडू किंवा उंदीर पकडण्यात श्वान आणि मांजर छान रमते आणि ते खेळताना पाहून प्राणिपालकही आनंद घेतात.
पेटखेळाची दुनिया
काही दिवसांपूर्वी प्राणिप्रेमींमध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जमिनीवर ठेवलेला आयपॅड, त्याच्या स्क्रीनवर पोहणाऱ्या माशाचे दृश्य आणि तो मासा पकडण्यासाठी प्रयत्न करणारे गुबगुबीत मांजर. माशावर पंजा मारला की सुळकन पुढे सरकणारा मासा आणि इतक्या जवळ असून मासा पकडता का येत नाही म्हणून अस्वस्थ झालेले मांजर, असे त्या व्हिडीओचे स्वरूप होते. हा व्हिडीओ मांजरांसाठी तयार करण्यात आलेल्या खेळाच्या अॅपची एक प्रकारे जाहिरातच होती. प्राण्यांचा वेळ घालवणारी अनेक अॅप्स सध्या अॅण्ड्रॉइड आणि आयफोनमध्ये उपलब्ध आहेत. स्क्रीनवर पळणारा उंदीर, झुरळ, माशी, कोळी, पोहणारे मासे अशा स्वरूपातील हे खेळ आहेत. उंदीर, पक्षी यांच्या ध्वनीची, अगदी खुडबुडीच्या आवाजाचीही जोड या अॅप्समध्ये आहे. अशाच प्रकारे भिंतीवर लेझर किरणांचा वापर करून प्राण्यांना खेळवण्यासाठीही अॅप्स आहेत. यातील प्राणिपालकांच्या पसंतीला उतरलेला अजून एक प्रकार म्हणजे आवाजांचे खेळ. कुत्रे किंवा मांजराचे वेगवेगळे आवाज या अॅप्सच्या माध्यमातून मिळतात. त्या आवाजांना प्राणी प्रतिसाद देतात. मात्र हा खेळ प्राण्यांपेक्षा त्यांच्या पालकांसाठीच अधिक बनला आहे.
उंदीर आणि मासे प्राणिपालक प्रिय
गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर नुसते कुत्री किंवा मांजरासाठीचे खेळ, असे शोधले तरीही वेगवेळ्या प्रकारचे किमान वीस ते पंचवीस मोफत अॅप्स सहज मिळतात. यामध्ये ‘फिश गेम’, ‘माऊस गेम’, लेझर पॉइंटर फॉर कॅट, ‘कॅट टॉइज- आंटहंट कॅट’ अशा काही अॅप्सना पशुपालकांची पसंती मिळत आहे. यातील काही अॅप्स जगभरातून ३५ लाखांपेक्षा अधिक मोबाइल वापरकर्त्यांनी डाऊनलोड केल्याचे दिसून येते. या अॅप्सच्या उपयोगाबाबत प्राणिपालकांमध्ये मतमतांतरे आहेत. प्राणी या खेळांची मजा घेतात का, खूप वेळ या आभासी दुनियेत रमतात का, हा अजूनही थोडा संभ्रमाचाच मुद्दा आहे. किंबहुना स्क्रीनवरचे मासे किंवा उंदीर हे त्यांना कळतात का, याबाबतही मतमतांतरे आहेत. ही अॅप्स तयार करणाऱ्या कंपन्यांकडून मात्र प्राणी खूश होत असल्याचे दावे करण्यात आले आहेत. वस्तुस्थिती काय याबाबत ठोस निष्कर्ष नसले तरी ही अॅप्स प्राणिप्रेमींमध्ये चर्चेत मात्र आहेत.
खेळ आणि व्यायाम हवाच
बॉलमागे धावणे किंवा फिरायला जाणे यात प्राण्यांना विरंगुळा मिळण्यापेक्षाही त्यांना आवश्यक असणाऱ्या शारीरिक हालचाली मिळणे, व्यायाम होणे हा हेतू असतो. मोकळे असलेले कुत्रे किंवा मांजर हे एखादा पक्षी, पाल यांच्यामागे धावणे हे साहजिक आहे. त्यामध्ये खेळण्यापेक्षाही शिकार करणे हा त्यांचा हेतू असतो. त्यामुळे आभासी दुनियेतल्या उंदीर किंवा मासा पकडण्यात प्राणी काही काळ गुंततीलही, मात्र त्यांना आवश्यक असा व्यायाम मिळण्यासाठी पारंपरिक खेळांना पर्याय नाही हे नक्की!