यंदा परतीच्या पावसाने ओढ दिल्याने कळंबोली येथील तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. या तळ्यामध्ये अवघे चार फूट पाणी असल्याने त्यात घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन कसे करावे, असा प्रश्न भाविकांना पडला आहे. सिडकोने यावर अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे तलावाची हीच स्थिती कायम राहिल्यास कळंबोलीतील पाच हजार गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी रोडपाली तलावाला निरोप देऊन नजीकच्या खाडीकिनारी विसर्जनासाठी जावे लागणार आहे.
रोडपालीच्या या तलावाला येथील स्थानिक बापदेवस्थानाच्या नावाने ओळखतात. याच तलावाशेजारी नवीन बांधलेल्या उदंचन केंद्रामुळे या तलावामधील पाण्याची पातळी कमी होत असल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत. मात्र या तक्रारीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. गणेश विसर्जनामुळे या तलावाशी सामान्य कळंबोलीकरांची आस्था जोडली गेली. दरवर्षी विसर्जनाच्या दिवशी अग्निशमन दलाचे जवान बोटीतून तलावाच्या मध्यभागी गणेशमूर्तीचे विसर्जन करतात. या तलावात त्या वेळी पोहण्यास मनाई केली जाते. मात्र या तलावाने तळ गाठल्याने गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सिडको वसाहतींमधील खांदेश्वर तलावामधील पाण्याची पातळी त्या तुलनेत जास्त असल्याने तेथे हा प्रश्न उद्भवणार नाही. मात्र नवरात्रोत्सवामध्ये पाऊस न पडल्यास या तलावाची परिस्थिती रोडपाली तलावाप्रमाणे होण्याची शक्यता रहिवाशांना व्यक्त केली आहे. या तलावामध्ये बाहेरून पाणी आणून टाकणे सिडकोला शक्य नाही. त्यामुळे नऊ दिवसांमध्ये पावसाच्या पाण्याने रोडपाली तलाव भरावा यासाठी सामान्य कळंबोलीकर साकडे घालत आहेत. अपुरा पाणीसाठा असतानाही सकाळी-सायंकाळी येथे वाहने धुण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. अवजड वाहनांच्या चालकांना या तळ्यामधील पाणी मोफत मिळत असल्याने या पाण्याच्या साहाय्याने ते उघडय़ावर आंघोळही करतात. या तलावातील पाणी दरवर्षी का कमी होते, याच्या मुळाशी जाण्यात सिडकोच्या अभियंत्यांना स्वारस्य नाही.

अजूनही पाऊस येण्याची शक्यता आहे, परंतु पाऊस न पडल्यास तलावामधील पाण्याची पातळी तपासली जाईल. आतापर्यंत अशी समस्या जाणवली नाही. त्यामुळे या गंभीर विषयावर सिडकोकडून नक्कीच काही तरी उपाययोजना होईल.
– किरण फणसे, अधीक्षक अभियंता, सिडको

Story img Loader