गणपतीचे गाव म्हणून पेण तालुका व त्यातील हमरापूर परिसर जगात प्रसिद्ध आहे. येथील हजारो गणेशमूर्ती जगातील विविध देशांत, तसेच देशातील राज्यांत जात असतात. कोटय़वधींची आर्थिक उलाढाल होत असलेल्या या व्यवसायात गणेशमूर्ती नेणाऱ्या व्यापाऱ्यांनी तीन ते चार वर्षांची ७० लाखांपेक्षा जास्त थकबाकी करून ठेवल्याने पेण तालुक्यातील गणेशमूर्ती कारखानदारांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कर्जबाजारी कारखानदारांच्या मागे बँकांनी कर्जफेडीचा तगादा लावल्याने कारखानदारांची चिंता वाढली आहे.
पेण तालुक्यातील पेणसह जोहे, हमरापूर, कळवे, दादर, वरेडी, रावे या गावांतून शेतीला जोड व्यावसाय म्हणून अनेकांनी गणेशमूर्ती तयार करण्याचे कारखाने सुरू केले आहेत. वीस ते बावीस वर्षांपूर्वी हमरापूर परिसरात एका मुंबईतून आलेल्या कारागिराने गणपती बनविण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेक कारखाने सुरू झाले. आज ४०० पेक्षा अधिक कारखाने येथे सुरू आहेत. आठ ते दहा हजारांपेक्षा अधिक कामगार येथे काम करीत आहेत. या कारखान्यांतून एक लाखापेक्षा अधिक मूर्ती तयार केल्या जातात. या व्यवसायात कोटय़वधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. व्यवसायाला साहाय्य म्हणून शासन जमिनी व घरांच्या तारणाच्या बदल्यात १० लाखांपर्यंतचे कर्ज देते. तसेच सुरुवातीच्या कर्जात ३५ टक्के सबसिडीही देते. पंचक्रोशीत उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना रोजगार मिळत नसल्याने अनेक तरुणांनी गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय पत्करला आहे. त्यामुळे येथील कुटुंबांना काही प्रमाणात आर्थिक आधारही मिळाला आहे, अशी माहिती जोहे येथील कारखानदार नितीन मोकल यांनी दिली.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही शहरांबरोबर गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटकातील गणपती मूर्ती व्यावसायिक पेणमधून कच्च्या मूर्ती नेत असतात. हा व्यवहार विश्वासावर चालत असे. एक वर्ष पैसे न देता मूर्ती घेऊन जाणे आणि मूर्तीची विक्री झाल्यानंतर पैसे देणे असा व्यवहार नित्याने होतो. परंतु या कारखान्यातून अनेक भागांत गणपती मूर्ती नेणाऱ्या व्यापाऱ्यांनी तीन ते चार वर्षांची ७० लाखांपेक्षा अधिकची थकबाकी केली आहे. या व्यापाऱ्यांनी थकबाकी करून दुसऱ्या कारखानदारांकडून मूर्ती घेऊन जाण्यास सुरू केले आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीचा प्रश्न निर्माण झाला असून व्यवसायावरही परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे कारखानदारांना पतपुरवठा करणाऱ्या बँकांनी कर्जफेडीचा तगादा लावल्यामुळे कारखानदारांनी चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती राजन पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा