शाडूच्या गणेशमूर्तीपेक्षा उपयुक्त; किंमतही आटोक्यात
पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>
२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून गणेशमूर्ती बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी होत असलेल्या जनजागृतीमुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची मागणी वाढत आहे. त्यामुळे या वर्षी शाडूच्या मूर्तीबरोबर कागदी लगद्यापासून बनविलेल्या मूर्ती बाजारात आल्या आहेत. या पूर्णपणे पर्यावरणपूरक मूर्ती असल्याचा दावा मूर्तिकारांनी केला आहे.
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लास्टिक बंदीसारखे अभियान राबविले जात आहेत. त्यामुळेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तीची मागणी भक्तांकडून वाढली आहे. याशिवाय बाप्पाच्या सजावटीतही इकोफ्रेंडली साहित्याचा वापरही होऊ लागला आहे. त्यामुळे या वर्षी शाडूबरोबर कागदीमूर्तीही आल्या आहेत.
वाशी सेक्टर ९ मधील कन्नडभवन येथे श्री सद्गुरू कृपा आर्टचे पंकज घोडेकर आणि रुपेश फुलसुंदर यांनी या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. या मूर्त्यांची होत असलेली मागणी पाहता आम्ही या पर्यावरणपूरक मूर्ती उपलब्ध केल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी आणल्या असून शाडूच्या व कागदापासून बनवलेल्या मूर्त्यां मोठय़ा प्रमाणात मागवल्या आहेत. एक ते दोन फुटांपर्यंत या मूर्त्यां असल्याचे रुपेश फुलसुंदर यांनी सांगितले.
वर्तमानपत्राच्या कागदांचा लगदा तयार करून मूर्ती तयार केली जाते. या मूर्ती पेणमध्ये तयार केल्या जात आहेत. सध्या नागरिकांमध्ये मूर्तीला अतिरिक्त सजावटीची मागणी असते. तयार मूर्तीवर विविध रंगरंगोटी असली तरी, मूर्ती अधिक आकर्षक, रेखीव दिसावी याकरिता गणेशभक्त आकर्षक आभूषण दिसण्यासाठी ‘डायमंड वर्क’ची मागणी करतात. परंतु या मूर्तीनाही आकर्षक रंगसंगतीने सजावट केलेली आहे. मात्र अतिरिक्त डायमंड लावणे टाळले आहे. ही मूर्ती पर्यावरणपूरक असल्याने ती पर्यावरणपूरकच ठरली पाहिजे, यामुळे त्यांना डायमंड लावले नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
मूर्तीच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ
रंग, शाडू मातीचे दर तसेच दळणवळण खर्च वाढल्याने यंदा मूर्तीच्या किमतीत वाढ झाली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या एक ते दोन फुटांपर्यंतच्या मूर्तीना दोन ते चार हजार रुपये तर शाडूच्या मूर्तीना तीन ते सहा हजार रुपये आणि कागदापासून बनवलेल्या मूर्तीना अडीच ते पाच हजार रुपये दर आहेत.
पाण्यात लवकर विरघळतात..वजनही कमीशाडू ,प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत या मूर्तीचे दर आवाक्यात आहेत. तसेच कागदापासून बनवलेल्या मूर्त्यां या वजनाने हलक्या आहेत. शाडूच्या मूर्तीचे वजन २० ते २५ किलो तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या १० ते १२ किलो असते. मात्र कागदीमूर्तीचे वजन अवघे ५ किलो असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. या मूर्त्यां पाण्यात लवकर विरघळतात.