नवी मुंबई : राज्यातील महायुती सरकारमध्ये एकत्र असणाऱ्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नवी मुंबईतील दरी आणखी रुंदावत असल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. शहरातील सिडको इमारती आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासात भाजप नेते गणेश नाईक यांचाच मोठा अडसर असल्याची टीका बुधवारी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीला मदत करण्याचे हे षडयंत्र असल्याचा टोला भाजप जिल्हाप्रमुख संदीप नाईक यांनी लगावला.

हेही वाचा >>> मच्छीमार खर्चाच्या जाळ्यात; ग्राहक महागाईच्या लाटेत!

नवी मुंबई भाजप नेते गणेश नाईक आणि शिवसेना नेत्यांमध्ये पूर्वीपासूनच विळ्या-भोपळ्याचे नाते राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नाईकांच्या विजयासाठी युतीचा घटक म्हणून शिवसेनेचे नेतेही त्यांच्या प्रचारात काही काळ दिसले. त्यानंतरही नाईक आणि या नेत्यांमधील दुरावा काही मिटला नाही. शिवसेनेत फूट पडल्यानंतर बरेच नेते, नगरसेवक मुख्यमंत्री एकनार्थ शिंदे यांच्यासोबत गेले. राज्यात भाजप आणि शिंदे सरकार अस्तित्वात आले. या घडामोडीनंतरही नाईक आणि स्थानिक शिंदे गटातील नेत्यांमधील दुरावा अजूनही कायम असून बुधवारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी पत्रकार परिषद घेत नाईकांवर विविध मुद्द्यांवर आगपाखड केल्याने  तणाव आणखी वाढला आहे.

हेही वाचा >>> माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे उकळण्याचे प्रकार; पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल

शिंदे गटाचे आरोप काय?

ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या धर्तीवर नवी मुंबईतही ही योजना राबवली जाणार असली तरी यासंबंधी करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात आमदार गणेश नाईक अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी केला. नवी मुंबई महापालिकेतील अधिकारी, पोलीस यांच्यावरही दबाव वाढविण्याचे प्रकार सुरू असून मुख्यमंत्र्री शिंदे यांच्या समर्थकांची कामे कशी अडवली जातील यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप चौगुले यांनी केला.  दरम्यान, सिडको इमारतींच्या पुनर्विकासाची कामे करणाऱ्या विकासकांनाही धमकाविले जात असल्याचा आरोप पक्षाचे संपर्कप्रमुख किशोर पाटकर यांनी केला. स्वत:ला लोकनेते म्हणविणारे अधिकारी हे काम थांबविण्याच्या प्रयत्नात आहेत, असाही आरोप पाटकर यांनी केला. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांना कामे थांबविण्यासाठी दूरध्वनी केले जात आहेत, असा आरोप  शिंदे  गटाचे आणखी एक पदाधिकारी अशोक गावडे यांनी केला. आरोप करणाऱ्यांनी नाव घेतले असेल तर प्रत्युत्तर देता येईल. आरोप करताना पुरावा देणेही आवश्यक आहे, अन्यथा बिनबुडाच्या आरोपात तथ्य नसते. भाजप आणि शिवसेना अतिशय योग्य पद्धतीने राज्याचा गाडा हाकत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या रूपाने सामील झाला असून विविध विचारांचे असूनही योग्य तो समन्वय साधत तिन्ही नेतृत्व उत्तम वेगवान विकासकामे करीत आहेत. याला कुठे तरी अडथळा आणणे वा आघाडीला फायदा होईल असे करणे षडयंत्राचा भाग असू शकतो. भाजप अध्यक्ष म्हणून मला सर्वांगीण विचार क्रमप्राप्त आहे.  – संदीप नाईक, भाजप, नवी मुंबई  जिल्हाध्यक्ष

Story img Loader