नवी मुंबई – ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा पाण्याचा महत्वाचा स्रोत असलेल्या बारवी धरणातून नवी मुंबई शहराला मंजूर असलेला पाण्याचा कोटा गणेश नाईक यांच्याकडे मंत्रिपद आल्याने यापुढील काळा पूर्ण क्षमतेने शहराला मिळेल अशी आशा नव्याने निर्माण झाली आहे. ८० दशलक्ष लीटर पाण्यापैकी सद्यस्थितीत नवी मुंबईकरांच्या वाट्याला जेमतेम ५५ ते ६० दशलक्ष लिटर इतकेच पाणी येते. यामुळे दिघा, ऐरोली, घणसोली यासारख्या उपनगरात अनेकदा पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होते अशा तक्रारी आहेत. आमदार असताना नाईक यांनी या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे चित्र होते. त्यांच्याकडे मंत्रिपद आल्याने बारवीचे पाणी पूर्ण क्षमेतेने शहराला मिळवून देण्याचे मोठे आव्हान नाईकांना आगामी काळात पेलावे लागणार आहे.

बारवी धरणात पाण्याचा जलसाठा वाढावा यासाठी या धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे धरणात पहिल्यापेक्षा अधिक पाणीसाठा होत असतो. धरणाच्या वाढलेल्या उंचीमुळे बारवी धरणात ४८८ दक्षलक्ष लीटर अधिक पाणीसाठा होत असून या पाण्याचा वापर करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिरिक्त पाणी वापराचे समन्यायी धोरण मध्यंतरी ठरविण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेला बारवी प्रकल्पातून २५ एमएलडी अतिरिक्त पाणी पुरवठ्याच्या मोबदल्यात ६८ प्रकल्प बाधितांना महापालिकेच्या अस्थापनेवर सामावून घेण्यात आले आहे. त्यानंतरही बारवीचे मंजूर पाणी पूर्ण क्षमतेने महापालिकेस मिळत नसल्याच्या तक्रारी असून हा प्रश्न यापूर्वी गणेश नाईक यांनी आक्रमकपणे लावून धरला होता.

हेही वाचा – ठाणे खाडीची देखरेख उच्च न्यायालयामार्फत; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे संरक्षण प्रयत्नांना बळ

बारवीच्या पाण्यासाठी जिल्ह्यात राजकीय चढाओढ?

बारवी धरणाचे वाढीव पाणी कल्याण डोंबिवली, ठाण्याचा काही भाग तसेच मिरा-भाईदर शहराला पुरविण्यात येते. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र डाॅ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील उल्हासनगर, दिवा यासारख्या परिसरालाही बारवी धरणाच्या पाण्याचा अतिरिक्त कोटा उपलब्ध करून दिला जात असल्याचा मुद्दा मध्यंतरी गाजला होता. उल्हासनगर, कल्याण डोंबिवली यासारख्या महापालिकांची एमआयडीसीकडे पाण्याची मोठी थकबाकी असूनही या शहरांना नियमित आणि वाढीव पाणी मिळते, मग नवी मुंबईला वेगळा न्याय का असा सवाल मध्यंतरी उपस्थित झाला होता. नवी मुंबईत गणेश नाईक यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने ठाणे जिल्ह्यात पाण्यावरुन शिंदे-नाईक संघर्ष पहायला मिळाला होता. दहा वर्षनंतर गणेश नाईक यांना पुन्हा मंत्रिपद मिळाल्याने शहरातील राजकीय ताकद वाढण्याची शक्यता असल्याने बारवीचे वाढीव पाणी ते शहरात वळविण्यात यशस्वी ठरतील का याकडे आता लक्ष लागले आहे.

एमआयडीसीकडे पाठपुरावा

बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर करारानुसार एमआयडीसीने नवी मुंबई महापालिकेला बारवी प्रकल्पातून ६८ प्रकल्पबाधितांना पालिका आस्थापनेवर घेण्याच्या निर्णयानुसार ६२ जणांना सामावून घेतले आहे. परंतु त्या मोबदल्यात २५ एमएलडी पाणी बारवी प्रकल्पातून नवी मुंबई पालिकेला मिळालेच पाहिजे. त्यासाठी पालिकेचा एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा – २२ पाणथळ जागांचे भवितव्य अहवालबंद

नवी मुंबई महापालिकेला स्वतःच्या मालकीचे धरण आहे. बारावी धरणातील पाणी कोट्याच्या वाटपाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. शासनाच्या निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. – प्रकाश चव्हाण, मुख्य अभियंता, एमआयडीसी

Story img Loader