नवी मुंबई : एक काळ होता की जेव्हा नवी मुंबई शहरात पुनर्विकासाकरिता दीड चटईक्षेत्र वाढवून दिल्याने शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण येईल, याचा विचार आम्ही करत होतो. परंतु, सध्याच्या एकत्रीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीमुळे (यूडीसीपीआर) काही ठिकाणी पाच ते सात चटईक्षेत्र मिळणार आहे. त्यामुळे शहराचे वाटोळे होईल, असे परखड मत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी व्यक्त केले.

नवी मुंबई, पनवेल, उरण यांच्यासह एकत्रितपणे ओळखल्या जाणाऱ्या महामुंबईच्या प्रगतीचा वेध घेऊन भविष्यातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘अॅडव्हाण्टेज महामुंबई’ या परिषदेत नाईक यांनी हे भाष्य केले. नवी मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी सात इतके चटई क्षेत्र निर्देशांक दिला जात असून यामुळे नागरी सुविधांवर ताण येणार असल्याने या योजना मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच यूडीसीपीआरच्या माध्यमातून होणारा विकास निसर्गप्रेमींना आवडणार नाही, असेही ते म्हणाले.

राज्य शासनाचा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विभाग असून त्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण १ आणि २ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. १ मध्ये मुंबई तर २ मध्ये मुंबई महानगर प्रदेशातील शहरे आहेत. एकत्रीकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सात चटई निर्देशांक देण्यात येत आहे. ही योजना नवी मुंबईत आणण्यात आली होती. मात्र आम्ही नवी मुंबई शहरात पुनर्विकासाकरिता एक किंवा दीड चटई निर्देशांक कसा मिळेल, याचा विचार करायचो, पण इथे सात इतका चटई निर्देशांक देण्यात येत आहे. त्यामुळे या नियमावलीमुळे शहराचे वाटोळे होईल. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली असून ही झोपु योजना शहरातून लवकरच हद्दपार होईल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही स्वातंत्र्यानंतरची एकमेव महापालिका असल्याचे सांगताना नाईक यांनी या पाण्यावर अन्य यंत्रणांकडून दावा केला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले,‘या शहराला गेल्या काही वर्षांत लुटण्यात आले आहे. या शहरावर इतके दायित्व वाढले आहे की, कामांची देयके देण्यासाठी तीन वर्षांचा काळ जाईल. या शहरावर आमचे प्रेम आहे. या शहरात आम्ही अनवाणी फिरलो आहोत. डोंगर भागात फिरलोय. इथली शेती पाहिली आहे. त्यामुळे या शहराचे जर वाटोळे होत असेल तर ते मी सहन करणार नाही.’ नवी मुंबईत २००० सालापासून पाणीपट्टी आणि घरपट्टीत वाढ होऊ दिली नाही आणि आता पुढील २० वर्षे अशी वाढ होऊ देणार नाही, असेही नाईक यांनी निक्षून सांगितले.

फ्लेमिंगोंचे अस्तित्व मिटविण्याचे प्रकार

नवी मुंबई शहर हे फ्लेमिंगोंचे शहर आहे. पण, आता फ्लेमिंगो क्षेत्राचे अस्तित्व मिटविण्याचे प्रकार सुरू आहेत. फ्लेमिंगो क्षेत्रातील तलावात पाणी येऊ नये यासाठी खाडीच्या मुखावर सिडकोने बांध घातले होते. हे बांध उखडून टाकण्याचे आदेश मी दिले आहेत. खाडीचे पाणी पुन्हा तलावात आले पाहिजे आणि तिथे पूर्वीप्रमाणे फ्लेमिंगो दिसले पाहिजेत, असे नाईक म्हणाले.

महामुंबईसमोरील आव्हानांचा वेध

● प्रतिमुंबई समजल्या जाणाऱ्या महामुंबईसमोरील आव्हानांचा वेध घेण्यासाठी आयोजित ‘अॅडव्हाण्टेज महामुंबई’ परिषदेत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलाश शिंदे, सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे सहभागी झाले होते.

● तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या यंत्रणेची महामुंबईच्या विस्तार आणि वृद्धीमागील भूमिका उलगडून सांगितली. तसेच भविष्यात उभ्या राहणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांचे चित्रही उपस्थितांसमोर मांडले.

● कार्यक्रमाला नवी मुंबईतील सामाजिक, औद्याोगिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी हजेरी लावली होती.

नवी मुंबई शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यानुसार पुढील ३० वर्षांकरिता शहरवासीयांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नवी मुंबईतील पाण्याची बचत करुन पाणीपुरवठा वाढविता येणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सेवाविषयक रोजगारांची वाढ होणार आहे.

कैलाश शिंदेआयुक्त, नवी मुंबई महापालिका

सिडकोची निर्मिती योजनाबद्ध शहरासाठी झाली आहे. सिडकोने नवी मुंबई शहराचा विकास केला. ही निर्मिती फलदायी झाली आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.

गणेश देशमुखसिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक

पनवेल शहरात पाणीपुरवठ्याची तूट कमी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. पनवेलमध्ये लोकसंख्या वाढत आहे. पनवेल शहरात झोपड्यादेखील वाढत आहेत. त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. तसेच भविष्यात रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे.

मंगेश चितळेआयुक्त, पनवेल महापालिका