शहरातील नागरी सुविधांच्या कामांची धिमी गती, पावसाळा सुरू होऊनही साफसफाई-गटारे दुरुस्तीला लागलेला ‘ब्रेक’, दिघा बेकायदा बांधकामांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार आणि पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या विरोधकांच्या हाती असल्याच्या ‘तप्त’ वातावरणात नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नगसेवक, महापौर, सभागृह नेते आणि एक सहकारी सध्या काश्मीरमध्ये दौऱ्यावर गेले आहेत. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षातील जबाबदार व्यक्ती दौऱ्यावर जाऊच कसे शकतात, असा सवाल करीत विरोधकांनी यावरून पालिकेत राळ उठवली आहे.

नवी मुंबईत नागरी आणि आरोग्य सुविधांचा बोजवारा उडालेला आहे.  त्यात राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या ‘पिकनिक’ काढण्याच्या कल्पनेवर विरोधकांनी सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. नवी मुंबई पालिकेतील ‘फिरस्ती’वरील नगरसेवकांना शिस्त लावण्यासाठी माजी मंत्री गणेश नाईक येत्या रविवारी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात पिकनिकवीरांचे कान टोचतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापौरांना कोणत्याही नागरिकांच्या समस्यांशी देणेघेणे नाही, हे  काश्मीरवारीवरून स्पष्ट झाले आहे.

महापौर आणि नगरसेवकांनी समाजमाध्यमांवर काश्मीरमधील छायाचित्रे  टाकण्याऐवजी नवी मुंबईतील नागरी समस्या दूर केल्याची छायाचित्रे टाकली असती तर बरे झाले असते, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

शहरांत नालेसफाई अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी अतिक्रमणांवर कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. अशा परिस्थितीत स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सदस्य हजर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बैठकीनंतर सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

काश्मीरवारीची अनेक छायाचित्रे सध्या समाजमाध्यमांवर झळकत आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे, सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते जयवंत सुतार, नगरसेवक अशोक बुरखे, पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक गणेश म्हात्रे आणि एक सदस्य काश्मीर खोऱ्यात फिरत आहेत.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने येत्या २६ जूनला जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांनी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा वर्षां मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक काश्मीर सहलीबाबत काय टिप्पणी देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader