नवी मुंबई : ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांच्यामधील सत्तासंघर्षाला नव्याने धार चढल्याचे चित्र गुरुवारी दिसून आले. या मतदारसंघासाठी शिंदेसेनेने निवडलेला उमेदवार हा ‘डमी’ असून नवी मुंबईचा राजकीय घास घेण्याचा हा कट असल्याचा आरोप करत गणेश नाईक यांच्या कट्टर समर्थकांनी त्यांच्या उपस्थितीतच आक्रमक भूमिका घेतली. ठाण्यातून नवी मुंबईचा कारभार हाकायचा. नवी मुंबईतील गणेश नाईकांचे राजकीय वर्चस्व हाणून पाडायचे आणि शहराचा कब्जा घ्यायचा असा राजकीय ‘डाव’ ठाण्यातून आखला जात असल्याचा आरोपही करण्यात आला. नाईकांच्या उपस्थितीत हे आरोपसत्र सुरू असताना स्वत: गणेश नाईक आणि त्यांचे दोन पुत्र मात्र शांतपणे हे ऐकत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे मतदारसंघासाठी भाजपने संजीव नाईक यांच्या नावाचा आग्रह धरण्यात आला होता. महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपला सुटेल असे चित्र गेल्या महिनाभरापासून निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे नाईक कुटुंबियांना ‘कामाला लागा’ असा संदेशही वरिष्ठांकडून देण्यात आला होता. मतदारसंघ पदरात पडेल या आशेवर असलेल्या संजीव नाईक यांनी ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये प्रचारही सुरु केला होता. मात्र हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवसांचा अवधी शिल्लक असताना तो पदरात पाडून घेतला.

हेही वाचा… युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 

या लोकसभा मतदारसंघातून बुधवारी सकाळी शिंदे यांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली. यानंतर दिवसभर या मतदारसंघातील भाजपच्या गोटात शुकशुकाट होता.

नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्यासह त्यांच्या एकाही समर्थकाने प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. गुरुवारी सकाळी गणेश नाईक यांनी खैरणे येथील क्रिस्टल हाऊस येथील त्यांच्या भव्य कार्यालयात एका बैठकीचे आयोजन केले आणि तेथून या संर्घषाला धार चढली.

मुख्यमंत्र्यांवर शरसंधान

‘ठाणे’साठी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देऊन नवी मुंबईचा घास घेण्याचा प्रयत्न ठाण्यातून सुरू आहे, असा आरोप यावेळी नाईक समर्थकांनी जाहीरपणे केला. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हे शहर अतिशय नियोजीत आणि सर्वसुविधांनी युक्त करण्याचा नाईक यांनी प्रयत्न केला आहे. असे असताना गेले काही वर्षे नवी मुंबई पालिकेच्या कामकाजात ठाण्याहून ढवळाढवळ केली जात आहे, असा आरोप नाईक समर्थक व स्थायी समितीच्या माजी सभापती नेत्रा शिके यांनी केला.नवी मुंबईवर कब्जा मिळवून या शहराची वाताहत करायची असा हा कट असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिर्के यांची री ओढत इतर पदाधिकाऱ्यांनीही म्हस्के यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. कल्याण लोकसभेत सोपा उमेदवार देण्याच्या बदल्यात ठाण्यात ‘डमी’ उमेदवार द्या, अशी हातमिळवणी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाल्याचा आरोपही करण्यात आला. म्हस्के हे दुबळे उमेदवार आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याची जोरदार टीका पदाधिकाऱ्यांनी केली.

हेही वाचा… महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना विविध पोलीस ठाण्यात दाखल

नाईकांसमोर नगरसेवक आक्रमक

नाईक यांनी निवडणुकांच्या तयारीच्या निमीत्ताने बोलविलेल्या या बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांचे कट्टर समर्थक नेत्रा शिर्के, रविंद्र इथापे, दशरथ भगत, सुरज पाटील, जयवंत सुतार या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमीका घेण्यास सुुरुवात केली. संजीव नाईक हेच योग्य उमेदवार होते. मात्र शेवटपर्यत आपल्याला झुलवत ठेवण्यात आले. हा नाईक कुटुंबाला संपविण्याचा डाव असल्याचा आरोप नेत्रा शिर्के आणि सुरज पाटील यांनी केला आणि इतरांनीही आरोपांच्या फैरी सुरु केल्या. समर्थक आक्रमक होत असल्याचे पाहून नाईक सुरुवातीला त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. मात्र एरवी नाईकांपुढे माना खाली घालून बसणारे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अचानक आक्रमक बनल्याने उपस्थित आवाक झाले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh naik supporters criticized the chief minister eknath shinde over thane lok sabha candidate asj
Show comments