लोकसत्ता टीम पनवेल ः पनवेल तालुक्यात अनेक दिवसांपासून एकाचवेळी अनेक घरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशातच खारघर वसाहतीलगत असणाऱ्या पेठ गावात गुरुवारी मध्यरात्री हातामध्ये कोयता आणि चोरीचे इतर साहित्य घेऊन बनियानधारी टोळीतील चौघेजण फिरताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या टोळीने गुरुवारी मध्यरात्री पेठ गावात अनेक घरांत चोऱ्या केल्या.
मागील महिन्याभरात पनवेलमधील ग्रामीण भागात वेगवेगळ्या गावांमध्ये आणि सिडको वसाहतींमध्ये घरफोड्या झाल्या. चोरटे मध्यरात्री २ ते चार वाजेपर्यंत सक्रिय असतात. पायात चप्पल न घालता, अंगावर शर्ट न चढविता अवघ्या बनियानीमध्ये चोरी करण्यासाठीचे साहित्य आणि हातामध्ये कोयता घेऊन या टोळीतील घरफोडी करणारे चोर राजरोस फिरत आहेत. ज्या घरांना बाहेरून कुलूप दिसले की त्याशेजारील घरांना बाहेरून कडी घालून कुलूप असलेल्या घरात घरफोडी करून लूट करून त्या परिसरात अशी बंद दिसतील तेवढी घरे फोडण्यात हे दरोडेखोर सराईत आहेत. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेळा आणि तळोजामध्ये एकवेळा तसेच खारघरमध्ये मोठ्या घरफोड्या या चोरट्यांनी केल्या आहेत. नवी मुंबई पोलीस अद्याप या कोयता बनियान टोळीला पकडण्यात असमर्थ ठरली आहे.
हेही वाचा – पगार न झाल्याने पनवेल आगारातील एसटी कामगारांचा घंटानाद
हेही वाचा – खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान
चोरांच्या राजरोस फिरतानाच्या व्हिडीओमुळे रहिवाशांनी पनवेल महापालिकेकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी पनवेल महापालिकेला सीसीटीव्ही लावण्याची शिफारस केली होती. महिला व बालकल्याण लेखाशिर्षकाखाली पालिका प्रशासनाने १२० कोटी रुपये खर्च करुन सीसीटीव्ही कॅमेरा आणि नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र या प्रस्तावाला गती मिळाली नाही.
© The Indian Express (P) Ltd