बेलापूर ग्रामस्थांचा विरोध; मोर्चा काढून पोलीस आयुक्तांना निवेदन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी मुंबई : ग्रामस्थांचा विरोध झुगारून गेली ४० वर्षांपासून रखडलेल्या विस्तारित गावठाणांच्या सर्वेक्षणाला मंगळवारी चोख बंदोबस्तात बेलापूर गावातील नाना पोवळे यांच्या घरापासून सुरुवात करण्यात आला. बेलापूर ग्रामस्थांनी याला विरोध करीत निषेध मोर्चा काढत पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.
राज्य शासनाने नवी मुंबई शहरनिर्मितीसाठी ५९ हजार प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. या जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांच्या गावांचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते पण ते पूर्ण करण्यात आले नाही. केवळ सात गावांचे सर्वेक्षण त्या वेळी करण्यात आले होते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकारी व सिडकोला हे सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारपासून सिव्हिल इंजिनीअरिंग प्रा. लि. या कंपनीच्या वतीने या सर्वेक्षणाला बेलापूरमधून सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, याला बेलापूर ग्रामस्थांनी विरोध केला. गेली दोन दिवसांपासून बैठका घेत ग्रामस्थ एकत्र आले आहेत. मंगळवारी सर्वेक्षणासाठी बंदोबस्तात पथक आल्यानंतर सर्व ग्रामस्थ येथील राम मंदिरात एकत्र जमा झाले. त्यांनी विरोधात घोषण देत तहसीलदारांशी बोलण्याची मागणी केली. मात्र ते न आल्याने सायंकाळी ४ वाजता गावातून निषेध मोर्चा काढत पोलीस आयुक्तांना निषेधाचे निवेदन दिले.
स्थानिक आमदार व सरकारी अधिकारी ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १२२ अंतर्गत सिटी सर्वेक्षण करण्याची गरज आहे. येथे फक्त सरकारी अधिकारी बांधकाम सर्वेक्षण करीत आहेत. त्यामुळेच ग्रामस्थांचा याला विरोध आहे. तत्काळ प्रॉपर्टी कार्ड व सनद देण्याची आवश्यकता आहे. उद्या सर्वेक्षण करून शासन कोणताही निर्णय घेईल ते कशासाठी करताय हेच स्पष्ट नाही. त्यामुळे हे सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे नीलेश पाटील यांनी केला आहे.
आम्हाला सर्वेक्षण कशासाठी हे सांगितले जात नाही.
उद्या आमची घरे तुटली तर आम्ही काय करायचे? अशी भीती ग्रामस्थ ज्योती पाटील यांनी बोलून दाखवली. तर आम्हाला या घरांचे प्रॉपर्टी कार्ड व सनद देणार असाल तर आम्ही स्वागत करू, परंतू दिशाभूल खपवून घेतली जाणार नाही, असे कोमल म्हात्रे या ग्रामस्थ महिलेने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सर्वेक्षणास सिडकोचे सर्वेक्षण अधिकारी बी.एल.राठोड, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार वासुदेव पवार, सर्वेक्षण अधिकारी नरेश जाधव, तलाठी ईश्वर जाधव तसेच माजी विरोधी पक्ष नेते स्थानिक नगरसेविका पूनम पाटील यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता, एनआरआय पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले.
गावठाण विस्तारित जागेवरील घरांचे पूर्ण सर्वेक्षण करून त्याची माहिती शासनाकडे पाठवणार आहे. हा सव्र्हे शासनाच्या आदेशानुसार होत आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वेक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे फक्त एकटय़ा बेलापूर गावचा नव्हे तर शहरातील सर्वच गावठाण विस्तारातील सव्र्हे करण्यात येत आहे. या सव्र्हेनंतर नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेच शासन योग्य निर्णय घेणार आहे. त्यामुळे फक्त एका गावचा सव्र्हे होणार हे चुकीचे आहे.
-राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी ,ठाणे
माझ्या घरापासून आज गावठाण विस्तार सर्वेक्षणाला सुरुवात झाली. आमच्या घराचा पुनर्विकास करताना आम्हाला वाढीव चटईक्षेत्राबाबत अडचणी येत होत्या. त्यामुळे आता सर्वेक्षण झाल्यामुळे योग्य व चांगला निर्णय शासन घेईल.
-नाना पोवळे, पहिले सर्वेक्षण झालेले कुटुंबप्रमुख.