सर्वेक्षण कशासाठी? बेलापूर ग्रामस्थांची भूमिका

नवी मुंबई : गेली ४० वर्षे रखडलेल्या गाव गावठाण सर्वेक्षणाला मंगळवारपासून बेलापूर येथून सुरुवात होणार आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जुन्या व नवीन घरांचे मालमत्तापत्रक मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. मात्र याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने विरोधाचा सूर उमटू लागला आहे. बेलापूरमधील गावकऱ्यांना बैठका घेतल्या असून आधी सर्वेक्षण कशासाठी? हे स्पष्ट करा नंतरच सर्वेक्षण करा, अशी भूमिका घेतली आहे.

राज्य शासनाने नवी मुंबई शहर निर्मितीसाठी ५९ हजार प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. या जमिनी संपादित करताना प्रकल्पग्रस्तांच्या गावांचे सर्वेक्षण करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते, पण केवळ सात गावांचे सर्वेक्षण त्या वेळी करण्यात आले होते. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाणे जिल्हाधिकारी व सिडकोला हे सर्वेक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे दोन वेळा आदेश दिले. त्यानुसार सिडको आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मंगळवारपासून या सर्वेक्षणाला बेलापूरमधून सुरुवात होणार आहे.

मात्र, आम्हा ग्रामस्थांना याबाबत कसलीच माहिती नाही किंवा आम्हाला त्याबाबतची नोटीसही मिळाली नाही. त्यामुळे ग्रामस्थंमध्ये संभ्रम वाढला आहे. दोन दिवसांपासून याबाबत बैठका घेत सोमवारी काही ग्रामस्थांनी आमदार म्हात्रे यांची भेट घेतली. कशासाठी सर्वेक्षण होत आहे. नवी मुंबईतील ग्रामस्थांचा क्लस्टरला विरोध आहे. परंतु मंगळवारी होणारे सर्वेक्षण कशासाठी आहे? याची माहिती नसल्याने ते कसे करू द्यायचे असा प्रश्न विचारला.

आमचा विरोध सर्वेक्षणाला नाहीच. परंतु सर्वेक्षण कशासाठी करत आहात याची माहिती आम्हाला हवी आहे. आमच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करणार तर आम्हाला याची संपूर्ण माहिती मिळालीच पाहिजे. पूर्वकल्पना न देता सर्वेक्षण होणार असेल तर आम्ही विरोध करणार असल्याचे बेलापूरचे ग्रामस्थ पवन पाटील यांनी सांगितले.

नियमानुसार खातेदार किंवा मिळकतदाराच्या मिळकतीचे नगर भूमापन करताना नोटीस देणे गरजेचे असून त्यात सर्वेक्षण कशासाठी करत आहात हे नमूद असते. परंतु कोणालाच याबाबत माहिती देण्यात आली नाही. ग्रामस्थांचा विरोध नाही. परंतु ते कशासाठी होतेय हे माहीत नसल्याने नाराजी आहे.

 -सम्राट पाटील, संघटक,९५ गाव संघर्ष समन्वय समिती.

मूळ गावठाणांच्या बाहेरील जागा सिडकोची आहे. त्या जागेवर बांधकामे झालेली आहेत. त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्या ठिकाणची संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे मूळ गावठाणाबाहेरील जागेवर किती बांधकामे झालेली आहेत याची संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्याप्रमाणे एका संस्थेद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याबाबतच्या सर्व प्राथमिक माहितीचा डेटा शासनाला दिल्यानंतर शासन त्याबाबत योग्य धोरणात्मक निर्णय घेणार आहे.

  -राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी ,ठाणे  

Story img Loader