मायलेकीच्या मृत्यूनंतरही पालिका, पोलिसांची डोळेझाक

ठाणे-बेलापूर मार्गावर तुभ्रे नाका परिसरात गॅरेज आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. पदपथ आणि रस्ता अतिक्रमणांनी अडवल्यामुळे नागरिकांना चालणेदेखील जिकिरीचे झाले आहे. अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी रहिवासी आणि वाहनचालक करत आहेत.

तुर्भे नाका परिसरात वर्षभरापूर्वी रस्ता ओलांडताना माय-लेकीचा आपघाती मृत्यू झाला होता. त्यांनतर नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक झाला. तेव्हा तात्पुरती कारवाई करण्यात आली, मात्र वाहतूक पोलीस आणि पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा वाहनांची गर्दी झाली आहे. येथील पेट्रोल पंपापासून तुभ्रे नाका उड्डाणपुलापर्यंत रस्त्यांच्या कडेला असणारी दुकाने, फेरीवाले, गॅरेजचालक यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. पदपथ आणि अरुंद रस्त्यावर रिक्षा, दुचाकी, दुरुस्तीच्या आणि वेल्डिंग मशीनच्या दुकानांनी बस्तान मांडले आहे. जेसीबी आणि मोठी वाहने उभी असतात. तर संध्याकाळी आंबेडकर चौक ते तुभ्रे वाहतूक पोलीस चौकीपर्यंत फेरीवाल्यांची गर्दी असते.

वर्षभरापूर्वी अरुंद रस्ता ओलांडताना माय-लेकीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांनतर या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले. दुकाने व गॅरेजचालकांवरही कारवाई करण्यात आली, त्यांनतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. हॉटेल, गॅरेजचालक, फेरीवाले यांनी मिळेल तेवढी जागा बळकावली आहे.

‘सविता केमिकल’ नजीक एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक पोलीस अवजड वाहनांवर कारवाई करतात, मात्र या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस पुढे सरसावत नाहीत. माय-लेकीच्या मृत्यूनंतरही वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासनाला वाहतूक कोंडी आणि अपघातांचे गांभीर्य नसल्याचा आरोप रहिवासी करत आहेत. एका नगरसेवकाचे कार्यालय या रस्त्यावरच आहे. त्यांची वाहने या रस्त्यालगत उभी असतात.

सहा पदरी रस्ता आहे कुठे?

माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कारकीर्दीत ठाणे-बेलापूर मार्ग सहा पदरी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यापैकी तुर्भे आणि दिघा परिसराचा रस्ता अतिक्रमणामुळे सहा पदरी करण्यात आला नाही. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकीर्दीत दिघा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा रस्ता सहा पदरी करण्यात आला. मात्र तुभ्रे स्टोअर परिसरचा रस्ता आजही गॅरेजवाले आणि दुकांनाच्या अतिक्रमणामुळे सहा पदरी झालेला नाही. राजकीय वरदहस्तामुळे या ठिकाणाच्या दुकानांवर कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावरील दुकांनाच्या अतिक्रमणांबाबत व गॅरेजवाल्यांविषयी माहिती घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येतील.

अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नमुंमपा

Story img Loader