मोठे उत्सव बंद; कडक नियमांमुळे आयोजकांची पाठ

नवी मुंबई काटेकोर नियमावली, वाढता खर्च आणि प्रतिसाद कमी मिळत असल्याने मोठे दांडिया, गरबा कार्यक्रमच बंद होत आहेत. त्यामुळे आकर्षक पेहराव आणि वाद्यसंगीताच्या ठेक्यावर थिरकणारे नवी मुंबईकरही आता या उत्सवाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत.

पितृपक्ष सुरू असतानाच दांडियाची थिरकन सुरू होत असे. ज्याप्रमाणे दहिहंडीचा सराव अनेक मैदानांत होई तसाच दांडियाचाही होत असे. नवरात्रीचे हजारो रुपयांचे पास मिळवण्यासाठी झुंबड उडायची. आता मात्र ते दिसत नाही.

वाशी, सानपाडा येथे गुजरात भवन, कोपरखैरणे येथे लोहाणा समाज, रोटरी क्लब आदी काही ठिकाणीच आता हे कार्यक्रम होत आहेत. बेलापूरमध्ये गोवर्धनी माता मंदिरात मराठमोळा नवरात्र उत्सव साजरा होत असतो. शिरवण्यातील नवरात्र उत्सवदेखील लक्षवेधी असतो.

घणसोलीमध्ये नवरात्र उत्सव चर्चेत होता, मात्र तोही आता बंद पडला आहे. कोपरखैरणेमधील कराडकर मित्र आणि उमेद प्रतिष्ठानचा नवरात्रउत्सवदेखील आर्थिक कारणांनी बंद झाला आहे. वाशीच्या ‘एनएमएसए’च्या मैदानावर रंगणारा दांडियाही काही वर्षांपासून बंदच आहे. मात्र बंगाली समाजबांधव हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करीत आहेत.

‘एमजी कॉम्प्लेक्स’चा दांडिया म्हणजे गर्दी. मात्र सध्या गल्ली-बोळात छोटे-छोटे उत्सव होत आहेत. कायद्याच्या अनेक बंधनांमुळे मोठे उत्सव करणे अशक्य होत आहे. आमच्याकडेही पूर्वी प्रचंड गर्दी होत असल्याने सहा ठिकाणी मंडल करून दांडिया करत असे. सध्या मात्र कॉम्प्लेक्सचे मैदान पुरेसे आहे.

       – किशोर मोरे,  आयोजक, सोमेश्वर नवरात्री मंडळ

आमच्या महाविद्यालयीन काळात दांडिया मंडळात प्रवेश मिळवण्यासाठी ‘ओळख’ लवावी लागत होती. आता घरातली कामे आटपेपर्यंतच कार्यक्रम संपलेला असतो.

– मेघना अग्रवाल,  गृहिणी