नवी मुंबई – भारत देशात स्वच्छता अभियानात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर, तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचे शहर असलेल्या नवी मुंबई  महापालिकेला  महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२’ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ‘क’ वर्ग महानगरपालिकांच्या गटात राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते  १५ कोटी पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याच महापालिकेच्या देखण्या व आकर्षक वास्तू परिसरात झाडांचा पालापाचोळा, झावळ्या तसेच प्लास्टिक बॅनरच्या कचऱ्याचा ढीग पडला असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत असून पालिकेने शहर स्वच्छतेबरोबरच पालिका मुख्यालय परिसरही स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे.

राज्य शासनामार्फत शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेस मिळालेला हा राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे मिळाला आहे. तसेच स्वच्छ भारत अभियानात देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर असलेल्या नवी मुंबई महापालिकाक्षेत्रामध्ये स्वच्छतेमध्ये ढिसाळपणा आल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानात पालिकेचा क्रमांक खाली येणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. नवी मुंबई शहरात स्वच्छतेच्या व सुशोभीकरणाच्या नवनव्या संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. शहर सुशोभित केल्याने परिसर सुंदर दिसतो व शहराविषयी सकारात्मक भावना तयार होते. पालिका आयुक्त नार्वेकर यांनी शहराची पाहणी सुरू केल्यानंतर स्वच्छतेबाबत आलेली मरगळ दूर झाली असली तरी स्वच्छतेबाबत पालिकेने अधिक गांभीर्य ठेवण्याची आवश्यकता आहे. पालिका मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर पार्किंग परिसराच्या बाजूलाच पालिका मुख्यालयात असलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा तसेच खराब झालेले फलक यांचा ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या व पालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला व स्वच्छतेला बाधा निर्माण होत आहे. पालिका स्वच्छता अधिकाऱ्यांमार्फत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करते. त्याप्रमाणेच पालिका मुख्यालय परिसरही स्वच्छ व नीटनेटका ठेवायला हवा.

नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंती, अंडरपासच्या बाजूच्या भिंती, सोसायटीच्या भिंती, सरकारी इमारतींच्या भिंती, पाण्याच्या मोठ्या जलवाहिन्या यांवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. ही भित्तिचित्रे साकारताना येथील मूळ आगरी-कोळी संस्कृतीला प्राधान्य देण्यात आल्याचे दिसत असून शहर व  परिसराला साजेशी अनुरूप चित्रे काढण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शहराचा कारभार ज्या वास्तूतून सांभाळला जातो त्या पालिकेच्या इमारतीचा व इमारतीबाहेरील परिसरही स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरातील उद्यानात जसे पालापाचोळा व इतर नैसर्गिक कचरा कम्पोस्ट करण्यासाठी कम्पोस्ट बिन बनविण्यात आले आहेत, तसे पालिका मुख्यालय परिसरातही पालापाचोळा कम्पोस्ट करण्याची सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

Story img Loader