दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी ट्रान्स हार्बर रेल्वेच्या स्थानकांवर उभारलेल्या बंकर्सचा सध्या कचऱ्याशी मुकाबला सुरू आहे. बंकर्समध्ये अक्षरश: कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. तर पान, गुटखा चघळत स्थानकात येणाऱ्या प्रवाशांनी तोंडातील पिचकाऱ्यांनी त्यांना लाल रंगही चढवला आहे.
अस्वच्छतेमुळे बंकर्समध्ये रेल्वे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे ते स्थानकावरील बाकडय़ांवर बसून पहारा देत आहेत.
मध्यंतरी नवी मुंबई पालिकेत आलेल्या निनावी पत्रात दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. त्यात रेल्वे स्थानक, पालिका मुख्यालय, कोकण भवन उडूवन देऊ, असे लिहिलेले होते. याची गंभीर दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनानेही ऐरोली, रबाळे, घणसोली, कोपरखरणे, वाशी, सानपाडा, सीबीडी, नेरुळ या स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. स्थानकांवर जवानांना संभाव्य हल्ला परतवून लावण्यासाठी बंकर्स उभारले.
परंतु तेथे जवानांना बसण्यासाठी सध्या कोणतीच सोय केलेली नाही. त्यामुळे स्थानकांवर खाद्यपदार्थ विकणारे फेरीवाले आणि खाद्यपदार्थ खाऊन प्लास्टिकच्या पिशव्या वा कागदाचे कपटे त्यात टाकत आहेत. यात भिकाऱ्यांची भर पडली आहे. भिकाऱ्यांचे काही सामान या बंकर्सच्या शेजारी पडलेले आढळले. विशेष म्हणजे रेल्वेचे कर्मचारीही त्यात कचरा टाकत आहेत.

सफाईचे काय?
स्थानकांवरील बंकर्समध्ये टाकलेला कचरा आणि इतर घाण काढण्याबाबत रेल्वेची काही जबाबदारी आहे का, या प्रश्नाला प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने उत्तर दिले नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Story img Loader