उरण : रविवारी उरण शहर आणि तालुका तसेच येथील विविध उद्योगात स्वच्छतेचा एक दिवस एक तास उपक्रम राबविण्यात आला. मात्र ज्या गांधीजीच्या नावाने ही स्वछता मोहीम राबविण्यात आली त्यांच्या जयंतीच्या दिवशी मात्र अनेक ठिकाणी पुन्हा एरे माझ्या मागल्या म्हणत कचऱ्याच्या राशी जशाच्या तशाच असल्याचे चित्र होते. त्यामुळे मोहीम राबविल्या तरी जोपर्यंत कचऱ्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना निर्माण केली जात नाही. तो पर्यंत ही समस्या कायम राहणार हे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : हरवलेले आजोबा जेष्ठ नागरिक दिनी कुटुंबीयात परतले; स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांची मोलाची मदत
‘स्वच्छतेसाठी एक तास “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उरण मधील घारापुरी, जेएनपीए कस्टम्स विभागातील अधिकारी व कर्मचारी,भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, इम्पोर्ट – एक्सपोर्ट बॅक ऑफ इंडिया मुंबई शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेचतसेच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि कर्मचारी यांच्या उपस्थित ही मोहीम राबविण्यात आली. तसेच ओएनजीसी प्रकल्पातील मुंबई औद्योगिक सुरक्षा बल सिनियर कमांडंट ललित झा यांच्या नेतृत्वाखाली पीरवाडी समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता अभियानात असिस्टंट कमांडंट ए.सी.मिश्रा,शिवाष्णू प्रभाकर,उरण युनिटचे इन्पेक्टर प्रदीप कुचेकर आणि १२५ सहकाऱ्यांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे उरण-करंजा येथील नौदलाच्या अधिकारी व १०० कर्मचाऱ्यांनी राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात एनएडी परिसर, परिसरातील वसाहतीसह केगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची साफसफाई केली. दुसरीकडे उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली १५० कर्मचाऱ्यांनी उरण शहरात स्वच्छता मोहीम राबवली.या मोहिमेत अधिकाऱ्यांसह सुमारे १५० कर्मचारी आणि माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सहभागी झाले होते.सर्वानी शहरातील अंतर्गत रस्ते,नाके आणि प्रभागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली.
हेही वाचा >>> नवी मुंबई :एपीएमसीत भाज्या महागल्या; पावसामुळे, पितृपक्ष पंधरवड्यात भाज्यांना मागणी असल्याने दरात १०-२०रुपयांनी वाढ
उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या मोहिमेत अधिकारी, विविध ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.
उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत कार्यालय परिसराची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता मोहिमेत अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
जेएनपीएने अध्यक्ष संजय सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बंदर,प्रशासन भवन, कामगार वसाहत परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.