नवी मुंबई : नवी मुंबई शहराने यंदा स्वच्छता सर्वेक्षणात देशात तिसरे स्थान पटकावले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहर, रस्ते कचरामुक्त योजनेअंतर्गत शहरातील कचऱ्याचे डबे उचलण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरात रस्त्यावर कचरा आढळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र आजही एपीएमसीबाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. नवी मुंबई शहरातील रस्ते कचरा मुक्त झाले परंतु एपीएमसीबाहेरील रस्ते कचरामुक्त कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबई शहरात काही वर्षांपूर्वी ठीकठिकाणी कचऱ्याच्या कुंड्या होत्या. परंतु बहुतांशी ठिकाणी कचरा हा कचराकुंडीमध्ये न टाकता रस्त्यावरच अस्ताव्यस्त टाकला जात होता. त्यामुळे रस्त्यावर आणि परिणामी त्या विभागात दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य असायचे .स्वच्छता सर्वेक्षण अभियानाअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून शहरातील कचरा कुंड्या या हटविण्यात आलेल्या आहेत. त्याऐवजी आता कचरा वाहून नेण्यासाठी घंटा गाडी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच प्राथमिक स्वरूपात सिवूडस येथे दोन भूमीगत कचरा कुंड्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिक रस्त्यावर कचरा फेकताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
मात्र आजही एपीएमसीत आणि बाजाराबाहेरील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग आढळत आहेत. एपीएमसी बाहेर अनधिकृत फेरीवाले बसून त्याच ठिकाणी सडलेली, खराब झालेले भाजी, फळ कचरा रस्त्यावरच टाकून जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच दुर्गंधी आणि घाणीचे दृश्य असते. नवी मुंबई शहराला कचरामुक्त ठेवण्यास नवी मुंबई महानगरपालिकेला यश प्राप्त झाले आहे, मात्र एपीएमसी बाहेर स्वच्छता ठेवणे हे नवी मुंबई महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान आहे.