अपंग, अंध, कर्णबधिरांसाठी हक्काचा विरंगुळा

नवी मुंबई  : अपंग, अंध, कर्णबधिरांसाठी नवी मुंबई महापालिकेने सानपाडा येथे हक्काचा विरंगुळा तयार केला आहे. अडीच हजार क्षेत्रफळावर संवेदना उद्यानाची निर्मिती केली आहे. आचारसंहिता संपताच ते खुले करण्यात येणार असून शासकीय पातळीवर राज्यातील हा पहिलाच उपक्रम असल्याचा पालिकेचा दावा आहे.

सानपाडा सेक्टर १० येथे २ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळावर हे विशेष उद्यान उभारण्यात आले आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये असा प्रयोग करण्यात आला आहे, पण तो खासगी पातळीवर. शासकीय पातळीवर नवी मुंबई महापालिकेने राज्यात हे पहिले उद्यान उभारले आहे.

या उद्यानात पंच ज्ञानेंद्रिये असणाऱ्या कान, नाक, डोळे, हात, जीभ यांची प्रतिकृती सकारण्यात आली असून, सर्वत्र हिरवळ बहरविण्यात आली आहे. भोवताली आकर्षक जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, ठळक अक्षरातील इंग्रजी व मराठी मोठी अक्षरे, मोठय़ा आकारातील साप-शिडी, उंच व भल्या मोठय़ा आकारातील कृत्रिम फुले, पुस्तकांच्या प्रतिकृती इत्यादी त्यांच्या गरजेनुसार आकलन व अनुभव समृद्ध करणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

‘विशेष’ झोपाळे

झोपाळ्यांवर दिव्यांगाना बसण्यास अडचणी येतात, याचा विचार करून विशिष्ट पद्धतीने झोपाळ्यांची निर्मिती केली आहे. त्यामध्ये त्यांची व्हीलचेअर बसेल अशी सुविधा करून देण्यात आली आहे.

रोड मॅप व ब्रेल पाटय़ा

उद्यानात प्रवेश करताना रोड मॅप व ब्रेल पाटय़ा लावण्यात आल्या आहेत. ब्रेललिपीच्या साहाय्याने उद्यानात कुठे काय आहे? कसे जाता येईल? याची माहिती पाटय़ांवर देण्यात आली आहे. व्यायामाची साधने, टेबल, लॉन, थेरपी यांचा समावेश आहे.

उद्यानात संवेदनांचा कोपरा

या मुलांना रंग, गंध, स्पर्श, स्वाद आणि नाद या संवेदनांचे सहजपणे आकलन व्हावे म्हणून खास उद्यानात शास्त्रीय पद्धतीने एक कोपरा तयार करण्यात आला आहे. कर्णबधिरांना आवाजाची माहिती होण्यासाठी मोठय़ा आवाजाची ब्रेल ट्री नाद, तर अंध व्यक्तींना निसर्गाच्या माहितीसाठी हाताला भासणारी सुगंधी झाडे, फुले लावण्यात आली आहेत.