पथदिवे बंद असल्याने महिला कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर ; अवजड वाहनचालकांना लुटल्याच्या घटना

रबाळे एमआयडीसी ते मुकंद आयर्न कंपनी मार्गावरील दिवे सध्या बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे येथील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात गर्दुल्ल्यांचा वावर मोठय़ा प्रमाणावर असल्याने रात्रीच्या वेळी या भागातून ये-जा करणे महिलांना धोक्याचे बनले आहे. गर्दुल्ले अवजड वाहनांसमोर येऊन त्यांना लुटत असल्याच्याही काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील नागरिक करीत आहेत. पालिकेने बंद दिवे सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था न केल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.

नवी मुंबईतील औद्योगिक वसाहतीतील सुमारे चार हजार कारखान्यांमध्ये महिला काम करतात. ठाणे, कल्याण, मुंबई तसेच नवी मुंबईतून येणाऱ्या पुरुष व महिला कामगारांना सायंकाळनंतर येथील मार्गावरून ये-जा करावी लागते; मात्र पदपथावरून चालताना दिवे बंद असल्याने अंधारातून वाट काढत बससाठी उभे राहावे लागते. अशा परिस्थितीत गर्दुल्ल्यांचा धोका येथील कामगारांच्या जिवाला निर्माण झाला आहे. रबाळे एमआयडीसी भागात दिघा अण्णा भाऊ  साठेनगर परिसरात वीज दिवे बंद आहेत. त्यामुळे अनेकांना जीव मुठीत घेऊनच येथून ये-जा करावी लागत आहे.महिन्याला ७ ते १५ या काळात कामगारांचे वेतन होते. त्याच वेळी या भागांत गुंड आणि गर्दुल्ल्यांचा त्रास होत असतो, असे राजू शिंगे यांनी ‘लोकसत्ता महामुंबई’शी बोलताना सांगितले. या भागात अवजड वाहनांसमोर येऊन चालकांना चाकू आणि सुऱ्याचा धाक दाखवला जातो व त्यांच्याकडील रक्कम लुटली जात असल्याच्या घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिमेन्स कंपनीच्या मागील भागात गदुल्ल्यांचा आणि गुंडांचा त्रास कामगारांना होत असतो. याकडे पोलीस मात्र डोळे झाकून आहेत, असा आरोप एका महिलेने केला. यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बाळासाहेब तुपे यांनी या भागांत गस्त वाढवली जाईल, असे सांगितले.

रस्त्यांवरील दिवे बंद असतील तर लवकरच पाहणी केली जाईल आणि ते तातडीने बसवले जातील.

प्रवीण गाडे, कार्यकारी अभियंता नवी मुंबई पालिका