नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली गावातील एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट झाला. हि घटना बाराच्या सुमारास घडली. स्फोटाचा मोठा आवाज आल्याने काही वेळ परिसरात खळबळ उडाली होती. या स्फोटामुळे आगही लागली होती मात्र अग्निशमन दल आल्याने पुढील अनर्थ टळला. आज दुपारी बाराच्या सुमारास घणसोली गावातील शंकर बुवा वाडीजवळ विठ्ठल मंदिर शेजारी असलेल्या जिजाई निवास, घर क्रमांक २१८७ येथे पहिल्या माळ्याच्या जिन्याखाली ठेवलेल्या सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
या स्फोटाने आग लागली. या आगीच्या ज्वालांमुळे दुसऱ्या मजल्याच्या जिन्यापर्यंत आग पसरली. त्यामुळे दुसऱ्या माळ्यावर ७ ते ८ माणसं अडकली होती. या घटनेबाबत माहिती मिळताच कोपरखैरणे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी एकीकडे आग विझवत असताना दुसरीकडे शिडी लावून दुसऱ्या मजल्यावर शिडीच्याद्वारे जाऊन अडकलेल्या लोकांना तेथेच थांबवले व पूर्ण आग विझवल्याची खात्री करुन सर्व अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढले. यात कोणीतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.