उरण शहराला पाइपलाइनद्वारे स्वयंपाकाचा गॅसपुरवठा करण्याची मागणी पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्याकडे करण्यात आली असून त्यासाठी लागणारी जमीन महाजनको कंपनीकडून देण्याची तयारी राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दाखविली आहे. त्यामुळे शहराला पाइपद्वारे गॅसची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे उरणमध्ये सीएनजी गॅस भरण्याचे स्टेशनही उभारण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी दिली आहे. ओएनजीसीसारखा गॅसपुरवठा करणारा देशातील सर्वात मोठा प्रकल्प उरण शहरालगत आहे. असे असले तरी मुंबई तसेच इतर ठिकाणी ज्या प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा केला जात आहे असे उरण शहरच गेली अनेक वर्षे मागणी करूनही पाइपलाइनच्या गॅस सुविधेपासून वंचित आहे. यासाठी महेश बालदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने उरण परिसराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बालदी यांनी दिली आहे. त्याकरिता नुकताच राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे झालेल्या बैठकीत उरण बोकडवीरा येथील महाजनकोच्या प्रकल्प परिसरातील एक हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी दिले आहे.

Story img Loader