‘गीतांजली सहकारी गृहनिर्माण संस्था’, सीवूडस्

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणे, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि हुंडाविरोधी  लघुनाटिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही पार पाडण्याचे काम ‘गीतांजली’तील महिला करतात आणि कलेची उपासनाही कायम ठेवतात.

भव्य प्रवेशव्दार. संरक्षक भिंतींच्या चारही बाजूंनी लावलेली आंबे, शेवगा, जांभूळ अशी डेरेदार झाडे त्यासोबत आवारात शोभेची फुलझाडे त्यामुळे चोहोबाजूंनी दिसणारी हिरवळ वातावरणात डोळ्यांनाही थंडाव्याचा अनुभव देते. इमारतीच्या दर्शनी भागात आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडतील अशी दूरध्वनी क्रमांकाची यादी. मध्यमवर्गीय लोकवस्तीची संख्या मोठय़ा प्रमाणात सिडकोने वसवलेली वसाहत असली तरी खासगीचा दर्जा राखून आधुनिकतेची कास धरणारी सीवूडस्मधील गीतांजली सहकारी गृहनिर्माण संस्था इतरांसाठी आदर्श ठरणार आहे.

१९९९ साली सिडकोने वसवलेले हे नियोजनबद्ध संकुल. ई-१ ते ई-८ अशा आठ इमारती असलेले हे भव्य संकुल. प्रत्येकी इमारतीत १६ खोल्या अशी एकूण १२८ कुटुंबे. प्रत्येक इमारतीच्या दर्शनीय भागात आवश्यक नोटिसा आणि सूचना लावलेल्या. २६ जानेवारीला होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात संस्थेतील महिलांसाठी ही हक्काची सुट्टी म्हणून पाळली जाते.

संस्थेतील लहान मुलांसाठी चमचा गोटी, चित्रकला, वेशभूषा स्पर्धा आयोजित केल्या जातात. याशिवाय महिला वर्गही सांस्कृतिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. हुंडाबंदी, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा यांसारख्या सामाजिक उपक्रमांवर आधारित लघुनाटय़ बसवली जातात. अर्थात या नाटकांचे आयोजन आणि दिग्दर्शन संस्थेतील महिला करतात.

संस्थेतील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येते. संस्थेतील आवारात विविधरंगी सजावट करण्यात येते. होळी वा इतर सणही पर्यावरणपूरक संकल्पनेनुसार साजरे केले जातात. संस्थेत २००४ सालापासून सात दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. संस्थेतील सभासदांच्या वर्गणीतून कार्यक्रम साजरे केले जातात.

वर्षांतून दोनदा सोसायटीच्या आवारातील झाडांची योग्य पद्धतीने छाटणी केली जाते. या झाडांच्या फळांचे सोसायटीतील सभासदांमध्ये वाटप केले जाते. ज्या घरापुढे फुलझाडे आहेत, ते सभासद कार्यक्रमांना लागणाऱ्या फुलांची आणि झाडांच्या देखभालीची जबाबदारी उचलतात. सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंतींची उंची वाढविण्यात आली आहे. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी-रविवारी स्वच्छता मोहीम सोसायटीच्या आवारात राबविण्यात येते.

पाणी बचतीसाठी टाक्यांना स्वयंचलित ‘कट ऑफ’ मीटर बसविण्यात आले आहे. तीन महिन्यांतून एकदा पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात येते. याशिवाय संस्थेत ओला आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते. यासाठी वैयक्तिक पातळीवर तो वेगळा करण्याची सक्ती करण्यात येते.

प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलांचे स्नेहसंमेलन भरविण्यात येते. याशिवाय मकरसंक्रात, महिला दिनही एकत्रितरीत्या साजरा केला जातो. महापालिकेच्या तसेच शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यावर सोसायटीतील सभासदांचा भर असतो. प्रत्येक महिन्याच्या खर्चाचा अहवाल सर्व सभासदांसमोर मांडण्यात येतो. गरजांच्या प्राधान्यानुसार खर्चाला महत्त्व देण्यात येते. आर्थिक व्यवहार पारदर्शकतेसाठी धनादेश दिले जातात.

संस्थेच्या आवारात पार्किंगची विशेष सोय करण्यात आली आहे. सोसायटीच्या नावे स्टीकरचे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचोरीला लगाम बसण्यास मदत झाली आहे. संस्थेच्या आवारात हॉर्न वापरावर बंदी घालण्यात आल्याचे संस्थेचे सचिव सुरेंद्र सिंग यांनी सांगितले.