नवी मुंबई : Navi Mumbai Weather Forecast पावसाळ्यात रेल्वे स्थानकांची गळकी छते, प्रवाशांना पाण्यतून करावा लागणार प्रवास हे नित्याचेच झाले आहे, परंतु घणसोली रेल्वे स्थानकात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. या स्थानकात अशी गळकी छते नसून संपूर्ण स्थानक पाण्यात असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात रात्रीपासून पावसाचा जोर होता. त्यामुळे सकाळपासूनच घणसोली रेल्वे स्थानकातील सबवे मध्ये पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्यातूनच प्रवाशांना आपली वाट काढावी लागली आहे. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ऐन कामाच्या वेळी चाकरमान्यांना, प्रवाशांना स्थानकातून बाहेर पडण्यासाठी किंवा स्थानकात प्रवेश करण्यासाठी डबक्यासारख्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागले. फलाटावरून खाली उतरताच प्रत्येकाला पाण्यातून चालावे लागले. आधीच प्रवाशी पावसामुळे हैराण त्यात कार्यलयात पोचण्याची लगबग असताना पाण्यातून जावे लागल्याने प्रवासी त्रस्त झाला होता. नवी मुंबई शहरातील सर्व रेल्वे स्थानकांचा सबवे भूमिगत आहेत. त्यामुळे सखोल भागात पाणी साचते, परंतु याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप बसविले जातात. मात्र घणसोली रेल्वे स्थानकात पंपाची व्यवस्था नसल्याचे निदर्शनास येत असून त्यामुळे रेल्वे स्थानकाला तळ्याचे स्वरूप आले आहे.