नवी मुंबई : घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलाव लवकरच नागरिकांसाठी खुला होणार आहे. घणसोली सेक्टर ३ सेंट्रल पार्क मधील तरण तलाव सुरुवातीपासूनच वापराविना पडून होता. त्यामुळे या तलावाची दुरावस्था झाली होती. मात्र आता ६० लाख रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली असून आता अखेर शहरातील नागरिकांसाठी हा जलतरण तलाव वापरता येणार आहे. नागरिकांसाठी मासिक पासाचे शुल्क १०० रुपये असणार आहे.

घणसोली सेक्टर ३ येथे नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने ३९ हजार १३५ चौ.मी. क्षेत्रफळावर १७ कोटी ५० लक्ष खर्च करून भव्य असे सेंट्रल पार्कची उभारणी केली आहे. पंचमहाभूतांवर आधारित संकल्पनेनुसार हे पार्क विकसित केले आहे. या सेट्रल पार्क मध्ये स्केंटिक रिंक, जलतरण तलाव, मिनी फुटबॉल टर्फ या सुविधा निर्माण केल्या आहेत. या ठिकाणी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सन २०१४ साली या उद्यानाचे बांधकाम सुरू झाले. मात्र मार्च २०२० मध्ये महापालिका निवडणूक आचारसंहितेत उद्घाटन रखडू नये म्हणून घाईघाईने तत्कालीन महापौर जयवंत सुतार यांनी पार्कचे उद्घाटन उरकून घेतले. त्यानंतर आलेली कोविडची पहिली लाट आणि टाळेबंदी लागू झाल्याने शहरातील सर्व उद्याने व पार्क बंद ठेवण्यात आले होते. कोविड निर्बंध शिथिल होताच २२ ऑक्टोबर २०२१ ला हे पार्क नागरिकांना खुले करण्यात आले. मात्र जलतरण तलाव बंदच ठेवण्यात आला होता. तलाव बंद असल्याने त्याची फरशी खराब होऊन तलावाची दुरवस्था झाली होती.

तलावाची तत्काळ दुरुस्ती करून ते नागरिकांसाठी वापरात आणावे अशी मागणी मे २०२३ मध्ये केली होती. आगरी सेनेचे शहर प्रमुख दिनेश म्हात्रे यांनी याबाबत पाठवपुरावा केला होता. अखेर आता हा जलतरण तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिकेने दिले असल्याची महिती म्हात्रे यांनी दिली आहे.

घणसोली सेंट्रल पार्क मधील जलतरण तलावाची दुरुस्ती करून ते तयार आहे. मात्र तलावाची सुविधा सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात असली पाहिजे असा मनपा आयुक्तांचा मानस आहे. त्यामुळे क्रीडा विभागाने निश्चित केलेल्या दरात पुन्हा दुरुस्ती करून ते अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे. ही मान्यता येताच हा जलतरण तलाव सुरू करण्यात येईल. अभिलाषा म्हात्रे-पाटील, क्रीडा अधिकारी,नवी मुंबई महानगर पालिका

Story img Loader