पनवेल : माझ्या एका कार्यकर्त्याने टीव्हीवर मुलाखत देऊन डॉ. सुजय विखे पाटील हे पारनेर तालुक्यात ६० टक्के मतांनी पुढे राहील असे बोलल्यामुळे खळस गावातील माजी सभापती तसेच माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा समाजमाध्यमाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीने फोनवरुन माझ्या मुलाखत देणाऱ्या कार्यकर्त्याला मी सुजय विखे पाटील याला गोळ्या घालीन असे बोलणारी धक्कादायक ध्वनीफीत कामोठे येथील पारनेरवासियांच्या जाहीर संवाद मेळाव्यात उपस्थितांना ऐकविण्यात आली. हीच दहशत मोडून काढण्यासाठी डॉ. सुजय हे लोकसभा निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी रविवारी रात्री आठ वाजता कामोठे येथील पारनेरवासियांच्या जाहीर संवादसभेत सांगितले.
रविवारी कामोठे वसाहतीमधील मध्यवर्ती मैदानामध्ये ही सभा घेण्यात आली. विजयभाऊ औटी मित्र परिवार, कामोठे रहिवाशी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ हे या मेळाव्याचे आयोजक होते. या धक्कादायक ध्वनीफीतीमुळे पारनेर तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण असून येत्या लोकसभेच्या निवडणुकीत विकास करणाऱ्या आणि उच्चशिक्षित उमेदवाराला निवडूण देण्याचे आवाहन डॉ. सुजय पाटील यांनी केले. या मेळाव्यात पनवेलचे भाजपचे आ. प्रशांत ठाकूर व इतर मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या ध्वनीफीतीमध्ये डॉ. सुजय यांच्या मातोश्रींना शिवीगाळ करण्यात आल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा – उरण : निवडणूक आणि आचारसंहिता काळात निसर्ग नष्ट करण्याचा प्रयत्न
कामोठे वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर डॉ. सुजय यांची ढोलताशा, फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रविवारची कामोठे येथील संवाद सभा लोकसभेच्या डॉ. सुजय यांच्या प्रचारासोबत पारनेर विधानसभा मतदारसंघातील विजय औटी यांचा प्रचार करण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे चित्र होते. निलेश लंके यांचे नाव न घेता डॉ. सुजय यांनी पारनेर विधानसभा मतदारसंघात दहशत माजविली जात असल्याचा आरोप केला. डॉ. सुजय यांनी ज्या नेत्याचे कार्यकर्ते खासदाराला गोळ्या मारण्याच्या विचारात असतील त्या तालुक्यातील सर्वसामान्यांच्या सुरक्षेविषयी लक्ष वेधले.