उरण तालुक्यातील बंदरावर आधारातील गोदामातील आयात व निर्यात मालांच्या चोरीच्या घटनांत वाढ झाली असताना उरण पोलिसांनी तीन गुन्ह्य़ांची उकल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात मोठय़ा प्रमाणात परदेशातून मागविण्यात आलेल्या मालाचा समावेश आहे.
मुंबईच्या एशियन पेन्टस या कंपनीने ४ लाख रुपये किमतीचे रसायन इंग्लंडमधून मागविले होते. उरणच्या द्रोणागिरी नोडमधील हिंद टर्मिनल या गोदामात ठेवण्यात आलेले हे रसायन चोरीला गेले होते. उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, थोरात यांच्या पथकाने हबीबुल्ला ममुदीन शेख उर्फ अन्सारी व इम्रान रशिद सौदागर या दोघांना या प्रकरणी अटक केली.
अन्य एका प्रकरणात नवी दिल्लीतील बी. एल. बी. कॉमेरिजने अमेरिकेतील जस्मीन कंपनीकडून साडेसहा लाख रुपये किमतीचे बदाम आयात केले होते. हे बदामही चोरीला गेले तसेच कॅलिफोर्निया अ‍ॅग्रो नटस, दिल्ली यांनी हाँगकाँग येथील कंपनीकडून ६ लाख रुपयांचे आरारुट मागविले होते. आरारुटच्या या गोणीही चोरटय़ांनी लंपास केल्या होत्या. पोलिसांनी या दोन प्रकरणी मो. नुरहसन अब्दूल गफार शेख, रघु रामकृष्ण कोणार व वसंत बाबाजी भानुशाली या तिघांना अटक केली.

Story img Loader