जगदीश तांडेल
गोपाळ कृष्ण वाचनालय, उरण
स्वातंत्र्यपूर्व काळात उरणमधील गुर्जर वकील, शारदाबाई कोर्लेकर, भार्गव वामन कोर्लेकर, गुलाबचंद पारेख आदींनी मिळून उरण शहरातील देऊळवाडी येथे गोपाळकृष्ण वाचनालयाची सुरुवात केली. सध्या हे वाचनालय शासनदरबारी अ दर्जाचे वाचनालय आहे. या वाचनालयामुळे उरणमध्ये स्वातंत्र्य चळवळींच्या बातम्या समजू लागल्या त्यानंतर उरणमध्ये स्वातंत्र्य चळवळीनेही वेग घेतला होता. साध्या कौलारू इमारतीत सुरू झालेले हे वाचनालय कात टाकत आहे.
उरण तसं छोटंसं गाव म्हणूनच प्रसिद्ध असून अवघ्या अडीच ते तीन किलोमीटरच्या परिघात वसलेले आहे. कोकणातील भाग असल्याने निसर्गसौंदर्याने नटलेले असे हे शहर सध्या विस्तारत असले तरी गावच म्हटले जात असे. या गावात शिक्षणाची सोय केवळ शहरात होती. मात्र येथील स्वातंत्र्य लढय़ातील सहभाग हा वाखानण्याजोगा. पारतंत्र्यात देशातील चळवळीची माहिती मिळावी म्हणून काहीजण शहरातील देऊळवाडीतील भागात भेटत असत. त्यावेळी हाती सापडलेले एखादे वृत्तपत्र आणून त्याचे वाचन करीत. त्यानंतर आपण काय करायच हे ठरवायचे. याच स्वातंत्र्याच्या ध्यासातून वाचन संस्कृतीचा उरणमध्ये १९४३ ला जन्म झाला. त्यातून ७५ वर्षांपूर्वी उरणमधील पहिले गोपाळकृष्ण वाचनालय स्थापन झाले. ते अमृतमहोत्सव साजरे करणारे तालुक्यातील एकमेव वाचनालय आहे. उरणच्या नव्या पिढय़ांना वाचनाची आवड निर्माण करण्यात या वाचनालयाचा मोठा हात आहे.
सध्या उरण हे येथील बंदर तसेच देशातील सर्वात मोठय़ा औद्योगिक क्षेत्रामुळे चर्चिले जाणारे नाव असले तरी आजही अनेकांना उरण कुठे आहे? असा प्रश्न असतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात उरणमधील गुर्जर वकील, शारदाबाई कोर्लेकर, भार्गव वामन कोर्लेकर, गुलाबचंद पारेख आदींनी मिळून उरण शहरातील देऊळवाडी येथे गोपाळकृष्ण वाचनालयाची सुरुवात केली. सध्या हे वाचनालय शासनदरबारी अ दर्जाचे वाचनालय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या वाचनालयामुळे उरणमध्ये स्वातंत्र्य चळवळींच्या बातम्या समजू लागल्या त्यानंतर उरणमध्ये स्वातंत्र्य चळवळीनेही वेग घेतला होता. साध्या जुन्या पद्धतीच्या कौलारू इमारतीत हे वाचनालय सुरू झाले होते. सध्या हे वाचनालय कात टाकत आहे. वाचनालयाच्या समोरील भागात आरसीसीचे बांधकाम करून वृत्तपत्र वाचनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तर वाचनालयाची मूळ इमारत आजही त्याच स्वरूपात जपण्यात आलेली आहे. एका कर्मचाऱ्याने सुरू झालेले या वाचनालयात सध्या चार कर्मचारी काम करीत आहेत. शहराची वाढ होत असताना शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या वाचनालयाकडे १२६७ फुटांची जागा आहे. या जागेत हे वाचनालय सुरू आहे.
वाचनालयात विविध विषयांची पुस्तके आहेत. बाल वाचकांसाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यांची नोंदणीही केली जाते. वाचनालयात आजीव, बाल तसेच नियमित असे ८०० सदस्य आहेत. वाचनालयाची ग्रंथसंपदा २८ हजार ४४४ इतकी आहे. तर मासिके ७२, दैनिके २१, साप्ताहिके ११ व पाक्षिके ६ येतात.
महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, निबंध स्पर्धा तर ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. वृत्तपत्र व इतर साहित्यांचे वाचन करण्यासाठी सकाळ व सायंकाळी दररोज ५० ते ६० जण वाचनालयाला भेट देतात. सध्या या वाचनालयाला अ दर्जा असल्याने शासनाकडून दरवर्षी ३ लाख ८४ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यातील ५० टक्के अनुदान वेतनावर खर्च केला जातो. तर २५ टक्के ग्रंथ, पुस्तके खरेदीसाठी त्याचप्रमाणे उर्वरित २५ टक्के रक्कम कार्यालय साहित्य खरेदीवर खर्च केली जाते. वाचनालयात सहा ते साडेसहा तासांपेक्षा अधिक काळ काम करावे लागत असताना मिळणारे मानधन हे तुटपुंजेच आहे. त्यामुळे शासनाने वाचनालयाच्या अनुदानात वाढ करून वाचनालयातील कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचीही मागणी होत आहे. वाचनालयाचा वार्षिक गाढा चालविण्यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान हे अपुरे पडत असल्याने अनेक दानशुरांकडून वाचनालयासाठी मदत घ्यावी लागते. याच माध्यमातून वाचनालयाचा दर्जा टिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाचनालयाची वाटचाल अमृतमहोत्सवी वर्षांकडे सुरू आहे. त्यासाठी वाचनालयाच्या अध्यक्षा वैशाली कोळगावकर व सचिव वर्षां पाठारे या प्रयत्न करीत आहेत. ग्रंथालयाची सुरुवात झाल्यानंतर त्याकाळी २५ पैसे किंमत असलेल्या ग्रंथांची संख्याही मोठी आहे.
विद्यार्थ्यांसाठी खास व्यवस्था
नेट सेट तसेच इतर व्यवसायिक अभ्यासक्रम घेऊन अभ्यास करणारे १५ विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज अभ्यास करण्यासाठी वाचनालयाचा वापर करीत आहेत. त्यांच्याकरिता लागणारी पुस्तकेही पुरविण्याचा प्रयत्न ग्रंथालयांकडून केला जातो. विद्यार्थ्यांची संख्या वर्षेनुवर्षे वाढत असल्याने जागा अपुरी पडत आहे. त्यांच्यासाठी जागा वाढावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
ऑगस्ट महिन्यापासून अमृतमहोत्सवी वर्षे साजरे केले जात असून विविध कार्यक्रमाचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आलेले आहेत. यामध्ये वाचक तसेच वाचनालयासाठी मदत करणारे यांच्याकडूनही यावर्षी मदत होऊन वाचनालयाची वाढ होईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.