गोठिवली

ठाणे-बेलापूर पट्टय़ाला अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा देणारे हे गाव म्हणजे गोठिवली. गावातील विठ्ठल रुखमाई मंदिरात गेली ८० वर्षे दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. पूर्वी या सात दिवसांत गावात मांसाहार होत नव्हता. हीच या गावाची खरी ओळख. नोसिल, पील आणि स्टॅण्डर्ड कंपन्या साठच्या दशकानंतर गावासमोर सुरू झाल्या आणि गावाचा हळूहळू कायापालट झाला. ग्रामस्थांना पोटापाण्याला लावणाऱ्या या तीन कंपनीचे मालक अरिवद मफतलाल यांचे निधन झाल्यानंतर गावातील कामगारांनी कृतज्ञता म्हणून मुंडन केले. असेच दु:ख महात्मा गांधी यांच्या निधनानंतर गावाने व्यक्त केले होते. गावकऱ्यांच्या वेगळ्या वर्तन पद्धतीमुळे गावातील अनेकांनी राजकीय, सामाजिक आणि कलाक्षेत्रात वेगळा ठसा उमटवला आहे.

चिंचवली, टेटवली आणि डोंगरापलीकडे असलेल्या दखणी भागातून आलेल्या ग्रामस्थांनी या गावाची मुहूर्तमेढ रोवल्याची माहिती उपलब्ध आहे; पण असे असले तरी या गावातील मूळ ग्रामस्थ म्हात्रे आणि पाटील ही दोन कुटुंबे असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यानंतर भोईर, मढवी, शेलार यांचे वर्चस्व या गावावर प्रस्थापित झाले. गावचा इतिहास दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचा आहे. गावाच्या तीन बाजूने भातशेती आणि पश्चिम बाजूस ठाणे खाडीकिनारा अशा भौगोलिक रचनेत गावचा विस्तार झाला. आता दोन उपनगरांना हे गाव जोडले गेले आहे.

गावच्या दक्षिणेस असलेली नोसिल कॉलनी म्हणजे एकेकाळचे बेलापूर पट्टय़ातील ‘फॉरेन’ मानले जात होते. कंपनीत येणारे अनेक गोरेसाहेब या कॉलनीत राहात असल्याने त्यांना पाहणे एक मोठे कुतूहल होते. महात्मा गांधीच्या चले जाव आंदोलनात या गावातील काही ग्रामस्थांनी भाग घेतला होता. त्यामुळे या गावाला छावणीचे स्वरूप आले होते. गोरे शिपाई घोडय़ावर पहारा देत होते. त्या वेळी गावातील काही टारगट मुले या छावणीतील सिगारेट आणि पावांची चोरी करीत असत. पाव घेतलेत तरी चालेल, पण सिगारेट कदापि नाही, असे सांगून या मुलांवर ब्रिटिश शिपायी बंदुका तानत असत. नंतर मात्र त्यांना सोडून दिले जात असे. गजानन जोमा पाटील या गावचे पहिले सरपंच. गावात विठ्ठल रुखमाईचे मंदिर झाले पाहिजे यासाठी त्यांचा आग्रह. एका महाराजांचा त्यासाठी सल्ला घेण्यात आला. त्यांनी सरळ कानावर हात ठेवले. या गावात मंदिर होणार नाही, असेच जणू काही त्यांनी सांगून टाकली. त्याचे कारणही तसेच होते. गावाच्या खाडीकिनारी दारूच्या भट्टय़ा सुरू असत. पिणे कमी असले तरी त्यातून मिळणाऱ्या पैशासाठी दारू गाळून ती ठाण्यात विकली जात होती. महाराजांचा स्पष्ट सल्ला पाटलांना चांगलाच झोंबला. ते त्याच दिवशी पंढरपुरात गेले. त्यांनी विठ्ठल रुखमाईची एक छोटी मूर्ती गावात आणली. ठेवायची कुठे, असा प्रश्न होता.

मंदिर बांधण्याची गरज होती; तरीही विठ्ठलभक्तांनी ती फकीर चांगू म्हात्रे यांच्या देव्हाऱ्यात काही वर्षे ठेवली. खडकावरच्या या तात्पुरत्या मंदिरातच अखंड हरिनाम सप्ताहाची बीजे पेरली गेली आणि आज अखंड हरिनाम सप्ताह सुरू करणारे पहिले गाव असा नावलौकिक असलेल्या या गावात गेली ८० वर्षे हरिनाम सप्ताह सुरू आहे.

ठाणे-बेलापूर पट्टीतील इतर गावांत जत्रा जोरात होत होत्या, पण गोठवली गावात हरिनाम सप्ताह आणि हनुमान जयंती हेच खरे जत्रेचे स्वरूप आणणारे उत्सव मानले गेले आहेत. यात होळी उत्सवाला एक अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक घरातून दोन-तीन शेर तांदूळ, डाळ, मीठ, मसाला जमा करून हा सप्ताह सुरू करण्यात आला आहे. यथाशक्ती चाराणे-आठाणे देणगी देणारा एखादा ग्रामस्थ होता. त्या वेळी गावच्या या सणाला अख्खे गाव नटूनथटून एकत्र येत होते. सरपंच जयराम भोईर यांच्या काळात याच सप्ताहात राज्य विधानसभेचे सभापती बाळासाहेब भारदे यांचे सुश्राव्य प्रवचन गावाने ऐकले आहे. सप्ताहाच्या काळात गावात मासांहार वज्र्य केला गेला आहे, तर वीणा घेण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांवर जबाबदारी सोपविली गेली होती. विठ्ठल रुखमाईची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रबाले नाक्यावर दुर्लक्षित असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्ती वाजतगाजत गावाने गोठवलीत आणली. आज एक भक्तीची आणि एक शक्तीची अशा दोन देवतांची मंदिरे समोरासमोर आहेत. याशिवाय मरीआई व वाघेश्वर मंदिरांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या मंदिराच्या माध्यमातून अलीकडे जत्रा आयोजित केल्या जातात. तळवली नाक्यावर नोसिल कंपनी सुरू झाली आणि गावाचा कायापालट होऊ लागला. रासायनिक कंपनी असल्याने समोरच्या ग्रामस्थांना धरून राहणे कंपनी व्यवस्थापनाच्या कामाचा एक भाग होता. त्यामुळे गावात शाळा, मंदिर, वीज, पाणी यांसारख्या सुविधा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आल्या. ह्य़ा कंपनीची एक चिमणी ज्यात रासायनिक द्रव जाळले जात असे ती या बेलापूर पट्टीची ओळख झाली. मुंबई, ठाणे, पनवेल येथून ही चिमणी दिसत असे. ती आता नेस्तनाबूत झाली. ही कंपनी नंतर रिलायन्स उद्योग समूहाने घेतल्याने चिमणी पण गेली आणि रासायनिक कंपनी पण बंद झाली आणि कामगारही नष्ट झाला. लेझीम, कबड्डी, भालाफेक, आटय़ापाटय़ा यांसारखे पारंपरिक खेळ मंदिर आणि गावाच्या बाहेर असलेल्या शेतात खेळले जात होते. आज ग्रामस्थांना खेळण्यास एकही मैदान नाही. मंदिराजवळच दुसरीपर्यंत शिक्षणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर घणसोली किंवा तुर्भे हाच शिक्षणासाठी पर्याय होता. याच प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पी. टी. म्हात्रे ह्य़ा पहिल्या तरुणाने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणासाठी पाच-सात किलोमीटरची पायपीट करावी लागणाऱ्या या गावात आज पस्तीस वकील आणि तीन डॉक्टर आहेत.

याच शिक्षणाच्या जोरावर काही ग्रामस्थांनी मुंबईत नोकऱ्या पत्करल्या, तर नारायण बाळाराम म्हात्रे यांना सार्वजनिक बांधकाम विभागाची पहिली सरकारी नोकरी लागली. राजा हरिश्चंद्र, शंकर पार्वती माहात्म्य यांसारखी देवदेवतांची नाटके जानू गोसावी यांनी निर्मित करून त्याचे प्रयोग बेलापूर पट्टीत अनेक ठिकाणी केले. गावाच्या बाहेर श्यामजी पटेल या व्यापाऱ्याच्या दोन दगडखाणी होत्या ज्या ठिकाणी आज रबाले पोलीस ठाणे आहे. दगडाच्या उत्खननाने याच ठिकाणी एक तलावाची (खदानाची) निर्मिती झाली आहे. गावात दिवसाआड येणारे डॉ. देसाई यांना पाण्यापासून होणाऱ्या आजाराच्या रुग्णांची संख्याच जास्त आढळून येत होती. त्यामुळे ग्रामपंचायतीने लवकरात लवकर गावात नळयोजना राबवली.

आज काही राजकीय घटना सोडल्यास या गावात इतिहासाला घट्ट चिटकून राहण्याची सवय आहे. काही विपरीत घडणार असेल तर गावाची परंपरा सांगून बंडखोरांना शांत केले जाते. अखंड हरीनाम सप्ताहातून ही एक एकता साधली जाते.