पनवेल : पनवेल तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन आरोग्य विभागाने दिलेल्या प्रस्तावाला सरकारने बुधवारी तत्वता मंजूरी देत पनवेलकरांसाठी २०० खाटांचे सामान्य रुग्णालय बांधण्याचा शासन निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचे अप्पर सचिव अरविंद मोरे यांनी बुधवारी याबाबतचे निर्णय जाहीर केले. यामुळे पनवेलकरांची भविष्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होईल.
पनवेलची लोकसंख्या पुढील काही वर्षात २५ लाखांवर पोहचेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल परिसराला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. आजही वर्षाला ११०० हून मृतांचे शवविच्छेदन पनवेलच्या महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात होते. हे उपजिल्हा रुग्णालय सुरू होऊन ५ वर्षे झाली. रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने यांनी या परिसरासाठी १०० खाटांच्या रुग्णालयाची श्रेणीवर्धन करुन २०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविला होता. याच प्रस्तावाला बुधवारी तत्वता मंजूरी देताना शासनाचे अवर सचिव अरविंद मोरे यांनी काढलेल्या शासन निर्णयात या रुग्णालयासाठी लागणाऱ्या जागेची विहीत प्रक्रियेने जागा उपलब्ध करुन त्या जागेवर रुग्णालयासाठी बांधकाम आणि पदनिर्मिती करण्यासाठी स्वतंत्रपणे आरोग्य विभाग कार्यवाही करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा…विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनात दलालांकरवी अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार ?
शासन निर्णयानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित रुग्णालयाच्या बांधकामाविषयीचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याचे काम हाती घ्यावे असेही निर्णयात स्पष्ट म्हटले आहे. शासनाचा निर्णय बुधवारी आल्यानंतर गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक पथक पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाची सध्याची इमारत आणि इमारतीच्या परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. देवमाने यांनी दिली. तसेच पनवेल शहरातील सध्या सुरू असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागेवर अधिकचे बांधकाम करणे शक्य आहे का, ही इमारत तेवढी मजबूत आहे का, रुग्णालयाच्या परिसरात डॉक्टरांच्या व आरोग्यसेवकांसाठी स्वतंत्र निवासस्थानाचे बांधकाम आजही अर्धवट अवस्थेत आहे. त्याचा वापर २०० खाटांच्या रुग्णालयासाठी होऊ शकतो का याबाबत सर्वेक्षण करणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याच सर्वेक्षण अहवालानंतर पनवेलचे दोनशे खाटांचे रुग्णालय उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीमध्ये होणार की आरोग्य विभाग नवीन जागेची शोधाशोध सुरू करणार यावर पनवेलच्या नवीन रुग्णालयाचे भवितव्य ठरणार आहे.
हेही वाचा…पनवेल : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक
नव्या रुग्णालयासाठी पाच एकर जागा लागेल. रुग्णालयाच्या नवीन जागेचा शोध, त्या जागेचा ताबा, रुग्णालयाचे नवीन बांधकाम त्यासाठी लागणारी वित्त मंजूरी, रुग्णालयात लागणाऱ्या पदभरतीची प्रक्रिया, त्या भरती प्रक्रियेची मंजूरी, पदभरतीची आर्थिक तरतूद यासर्व लालफीतीच्या कारभाराकडे लक्ष्य दिल्यास नवीन जागेतील रुग्णालय बांधणे आणि ते रुग्णालय पदभरती करुन कार्यान्वित करणे यास अनेक वर्षांचा काळ लागेल. सध्याचे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाला फेब्रुवारी २०११ मध्ये सुरुवात झाली. प्रत्यक्षात हे रुग्णालय सप्टेंबर २०१९ ला सूरु झाले. सरकारी लालफीतीच्या संथगतीच्या कारभारामुळे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे मजबूतीकरण आणि त्यावर मजले चढवून तसेच रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत नवीन रुग्णालयाचे बांधकाम हाती घेता येईल.