उरण तालुक्यातील चाणजे, केगांव, नागांव, म्हातवली, वेश्वी, फुंडे व हनुमान कोळीवाडी येथील पोटनिवडणुकीसह एकूण ७२ जागांसाठी २८ ऑक्टोबरला निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर वेश्वी ग्रामपंचायतीच्या दोन प्रभागांतील सहा जागांवर सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील उर्वरित तीन जागांसह एकूण ६४ जागांसाठी मतदान होणार असून एकूण १८१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला आहे.
या निवडणुकीत उरणमधील विविध राजकीय पक्ष आपापली ताकद अजमावत आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेना त्याचप्रमाणे शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेनेही उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीसाठी केगांव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ४३, चाणजेच्या १७ जागांसाठी ७१, नागांव ११ जागांसाठी ४६, फुंडे ९ जागांसाठी ३१, म्हातवली ११ जागांसाठी ३२, तर वेश्वीच्या ९ जागांसाठी २३ असे एकूण २४६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. हनुमान कोळीवाडा येथील पोटनिवडणुकीच्या दोन जागांसाठी एकही अर्ज आला नाही. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी केगांवमधून ६, चाणजेमधून १९, नागांवमधून १३, म्हातवली ९, वेश्वी ११ अशा ५८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Story img Loader