मुदत संपत आलेल्या उरणमधील सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यासाठी २८ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामध्ये नागाव, केगांव, चाणजे, वेश्वी, फुंडे, म्हातवली या सहा ग्रामपंचायतींचा समावेश असून हनुमान कोळीवाडा येथे पोटनिवडणूक होणार आहेत. ग्रामपंचायतींच्या एकूण ७० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. उरण तहसीलदारांनी ही माहिती दिली आहे.
उरण तालुक्यातील चाणजे या सर्वात मोठय़ा ग्रामपंचायतीत १७ वॉर्ड असून एकूण ६ प्रभागांत ही निवडणूक लढली जाणार आहे. तसेच केगाव ग्रामपंचायतीच्या १३ जागांसाठी ५ प्रभाग, नागावमध्ये ११ जागांसाठी ४ प्रभाग, म्हातवली येथे ११ जागांसाठी ४ प्रभाग तर फुंडे आणि वेश्वी ग्रामपंचायतीत ९ जागांसाठी ३ प्रभागात ही निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर होणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीचे आरक्षणही जाहीर करण्यात आलेले आहे. त्यानुसार या सहाही ठिकाणचे सरपंचपद महिलांसाठी राखीव आहे. यामध्ये नागावचे सरपंचपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव आहे. तर फुंडे, म्हातवली, वेश्वी, चाणजे, केगांव या पाच ग्रामपंचायतींत सर्वसाधारण महिला सरपंचाची निवड करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी ७ ते १३ ऑक्टोबर आहे. या सर्व ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.