निगा राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाची ‘अॅप’द्वारे नजर
पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून बुधवारी झालेल्या जिल्ह्य़ाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ग्रामपंचायतींनी किमान शंभर वृक्षांचे रोपण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंतच्या अनुभवानुसार वृक्षलावगड केली जाते, मात्र त्यांचे संगोपन वाऱ्यावर सोडले जाते. तसेच केवळ कागदावरच वृक्षारोपण केले जाते. हे टाळण्यासाठी जिल्हा कार्यालयाने एक अॅप तयार केले आहे. त्यानुसार वृक्षाचे ठिकाण, त्याची स्थिती, त्याची निगा राखली जाते का याची माहिती या अॅपच्या माध्यमातून नोंद केली जाणार आहे.
शासनाच्या वृक्षारोपणाच्या मोहिमा दरवर्षी केल्या जातात. अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे लावली जातात, मात्र त्यांची निगा न राखल्याने पावसाळा संपता संपता ही झाडे नष्ट झालेली असतात. असेच चित्र अनेकदा पाहावयास मिळत होते. शासनाचे आदेश आल्यानंतर यंत्रणा सोपस्कर पार पाडीत होती. त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हे नावापुरतेच उरले होते.याची दखल घेऊन रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान शंभर वृक्षांची लागवड करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी दिली. यामध्ये ग्रामपंचायतीने कोणत्या परिसरात वृक्षलागवडीसाठी खड्डा खोदला आहे याची माहिती खड्डा खोदताच अॅप टाकण्यात यावी. त्याची पाहणी तहसील कार्यालयाकडून करण्यात येईल, तसेच जिल्हा कार्यालयाचेही याकडे लक्ष असणार आहे. या वृक्षारोपणाच्या कार्यात चुकारपणा करणाऱ्यांविरोधात कारवाईचे संकेतही देण्यात आलेले आहेत. त्यामुळे उरणमधील ग्रामपंचायत विभागात झाडे लावून त्याची निगा राखण्याचे काम ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर राहणार आहे. शासनाच्या या कार्यक्रमामुळे गावागावांतून वृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळून वृक्षांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. यासंदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता तहसील कार्यालयासह, तलाठी त्याचप्रमाणे प्रत्येक शासकीय कार्यालयाला वृक्षलागवडीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामपंचायतींना शंभर रोपांची लागवड सक्तीची
ग्रामपंचायतींनी किमान शंभर वृक्षांचे रोपण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2016 at 05:09 IST
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gram panchayats compulsory planting of hundreds plant