उरण येथील द्रोणागिरी तसेच मोकळ्या जागांवरील गवताला लावण्यात येणाऱ्या आगीचे सत्र सुरूच असून सोमवारी सायंकाळी ६ वाजता बोकडविरा येथील उड्डाणपूला जवळ आग लावण्यात आली होती. या आगीच्या ठिकाणावरून जाणाऱ्या महावितरणच्या उच्च दाबाच्या तारांना या आगीमुळे धोका निर्माण झाला होता. आगीची माहीती मिळताच सिडकोच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन तातडीने या आगीवर नियंत्रण मिळविले. या ठिकाणी गावता बरोबरच उसाचे पिचाड ही टाकण्यात आले होते. तर आगीच्या शेजारीच पोलिसांनी गुन्ह्यात जप्त केलेली वाहने ही होती. त्यांना आग लागली असती तर आग वाढण्याची शक्यता होती.
उरण – पनवेल मार्गवरील हाईट गेटमुळे अग्निशमन दलाच्या वाहनाला अडथळा
उरण – पनवेल मार्गावरील सिडको कार्यालया जवळील खाडीपूल कमकुवत झाल्याने येथील पुलावरून ये जा करणारी जड वाहतूक सार्वजनिक बांधकाम विभागाने बंद केली आहे. तर अशा वजनी वाहनांची वाहतूक होऊ नये या करीता हाईट गेट उभारण्यात आले आहेत. या हाईट गेटमुळे सिडको कार्यालया शेजारी असलेल्या सिडकोच्या अग्निशमन दलाच्या वाहनांना एक दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा आग विझविण्यात उशीर लागत असल्याची घटना सोमवारी घडली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व सिडकोने या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून उरण पनवेल मार्गावरील हाईट गेट खुले करावेत अशी अपेक्षा अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केली.